बाप्पाच्या मदतीला ‘व्हाट्स अॅप’
By Admin | Updated: August 28, 2014 02:06 IST2014-08-28T02:06:48+5:302014-08-28T02:06:48+5:30
एरव्ही प्रत्येक जण मोबाईलवर ‘व्हाट्स अॅप’मध्ये डोके खुपसून दिसत असले तरी हेच ‘व्हाट्स अॅप’ आता गणरायाच्या मदतीसाठी धावून येणार आहे. गणेश विसर्जनामुळे होणाऱ्या तलावांच्या प्रदूषणाला

बाप्पाच्या मदतीला ‘व्हाट्स अॅप’
विसर्जनातून होणारे प्रदूषण टाळा : मनपा पाठविणार दोन लाख मॅसेज
नागपूर : एरव्ही प्रत्येक जण मोबाईलवर ‘व्हाट्स अॅप’मध्ये डोके खुपसून दिसत असले तरी हेच ‘व्हाट्स अॅप’ आता गणरायाच्या मदतीसाठी धावून येणार आहे. गणेश विसर्जनामुळे होणाऱ्या तलावांच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जनजागृती सुरू केली आहे. यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली जाणार असून शहरातील दोन लाख नागरिकांना मोबाईलवर ‘व्हाट्स अॅप’ द्वारे जगजागृतीपर मेसेज पाठविले जाणार आहेत.
यंदा सोनेगाव तलावात पुरेसा जलसाठा नाही. येथे मोठ्या मूर्तींचे विसर्जन होणार नाही. अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो भागात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली जाणार आहे. पीओपी मूर्तींचे तलावात विसर्जन होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे. या मूर्तीच्या मागील बाजूला लाल निशाणी व दुकानासमोर विसर्जनासंदर्भात सूचना लिहिलेले बॅनर्स लावण्याच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्या विके्रत्यांवर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
फुटाळाच्या स्वच्छतेसाठी १०० कर्मचारी
नासुप्रने फुटाळा तलावाच्या काठावर चौपाटी निर्माण केली. परंतु संबंधित कंत्राटदार तलावाच्या सफाईकडे लक्ष देत नाही. लोकांच्या आरोग्याचा विचार करता, आरोग्य विभागाने तलावाची स्वच्छता हाती घेतली आहे. यासाठी १०० सफाई कर्मचारी लावण्यात आले आहेत. यावर होणारा खर्च नासुप्रकडून वसूल केला जाणार आहे.
पीओपीच्या उपनियमांचा प्रस्ताव प्रलंबित
पीओपी मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात मनपाने उपविधीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. दोनवेळा स्मरणपत्रे पाठविली, परंतु अद्याप हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे.