‘कोसला’कारांचे चुकले तरी काय?
By Admin | Updated: November 30, 2014 01:23 IST2014-11-30T01:23:02+5:302014-11-30T01:23:02+5:30
अ.भा.म.सा.संमेलनाविषयी ज्येष्ठ मराठी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलेल्या अत्यंत जळजळीत प्रतिक्रियेपायी अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या असाव्यात असे दिसते.

‘कोसला’कारांचे चुकले तरी काय?
हेमंत कुलकर्णी - नाशिक
अ.भा.म.सा.संमेलनाविषयी ज्येष्ठ मराठी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलेल्या अत्यंत जळजळीत प्रतिक्रियेपायी अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या असाव्यात असे दिसते. आणि का झोंबू नयेत बरे? कुणी वरमावर बोट ठेवलं की तसं होणारच!
प्रतिक्रिया किंवा तिच्यातील शब्द तसे नेहमीच व्यक्तिसापेक्ष असतात. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी मागल्या शतकाच्या नवव्या दशकात याच संमेलनांविषयी भाकीत वर्तवताना, एकविसाव्या शतकात अशी संमेलने अस्तंगत होतील असे म्हटले होते. लोकांच्या सद्सद्विचारांवरील श्रद्धा, दुसरं काय? पण याच प्रतिक्रियेच्या उत्तरार्धात ते म्हणाले की, एका साहित्य संमेलनाची जागा अनेक संमेलने घेतील आणि ती गावोगावी होतील. किती व्यापक होता तो विचार! काही रिकामटेकडय़ांना केवळ काही दिवसच रिकामपणाचा उद्योग मिळण्यापेक्षा अनेक रिकामटेकडय़ांना तो अनेक दिवस मिळत राहावा, हा विचार व्यापक नाही?
पण नेमाडे यांचा विचार असा व्यापक आणि म्हणून वरवरचा नाही. तो तळस्पर्शी म्हणावा लागेल. साधी गोष्ट. या संयुक्त महाराष्ट्रातील काही असंयुक्त साहित्य परिषदांमधील चार रिकामटेकडी डोकी एकत्र येतात. साहित्य संमेलनाचा ऊरुस आवंदा कुठं भरवायचा, याचा विचार करू लागतात. कारण दोन-चार आवतनं खिशातच असतात. यांनी बघायचं असतं ते इतकंच की या दोन-चार रिकामटेकडय़ांपैकी कोणापाशी बख्खळ पैका आहे आणि त्या पैशांच्या राशी तो रिकाम्या करायला एका पायावर तयार आहे! मग त्याच्यासाठी दौरा निघतो. त्या दोन्ही-चारी ठिकाणी हे रिकामटेकडे आपला वेळ, जे काही समोर येईल, द्रवरूप वा घनरूप, ते रिकामे करण्यात दवडू लागतात आणि थैल्या रिकाम्या करण्याची ऐपत कोणाची जास्ती, त्याला मनोमन वरून मोकळे होतात.
मग रिकामा बसलेला कुणी कार्याध्यक्ष होतो कारण थैल्या रिकाम्या करायला राजी झालेला आपमतच स्वागताध्यक्ष झालेला असतो. त्यानंतर पुन्हा दोन-पाच वा पाच-दहारिकामटेकडे संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी आपला रिकामा वेळ दवडत दवडत महाराष्ट्रभर हिंडू लागतात. मतदान होतं. कुणीतरी बाजी मारतं. त्याआधी काही रिकाम्या जीवांनी अध्यक्ष निवडला जावा का आवडला जावा यावर आपल्या रिकामपणाचा यथेच्छ वापर करीत काथ्याकूट करून मोकळे झालेले असतात. निवड जाहीर झाली रे झाली की मग अशाच काही रिकाम्यांना जोर चढतो. निवडणूक कशी लबाडीने पार पाडली गेली, हे सांगण्यासाठी मग ते आपले बोरू घासून शाईच्या बाटल्या रिकाम्या करू लागतात. पेपरवाल्यांनाही पेपरातील रिकाम्या जागा कशा भरायच्या हा प्रश्न असतोच की! तो अनायासेच सुटून जातो.
संमेलनासाठी रिकामी जागा ठरली. रिकामे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष ठरले, परिसंवादाचे पोकळ विषय ठरले, त्यात बडबडण्यासाठी रिकामे वक्ते ठरले की सारी सिद्धता झाली. मग लक्षात येतं, अरे हे साहित्य उर्फ ग्रंथ संमेलन, मग त्यात ते नको? ज्यांना ‘ग्रंथवाचन’ ही संज्ञा ज्ञात आहे त्यांचे डोळे लकाकून नकळत त्यांची जिव्हा त्यांच्याच ओष्ठकडांवर फिरून येते. मग कुणीतरी रिकामा जंतू ग्रंथाचा वेगळाही एक अर्थ आहे, हे सांगतो व ग्रंथदिंडी आणि ग्रंथ-विक्री यांची आठवण करून देतो. रिकामटेकडे प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते पाचारण केले जातात आणि त्यांची दुकाने थाटण्याचा प्रबंधही केला जातो.
प्रत्यक्ष उरूसाला प्रारंभ होतो. असंख्य हवशे नवशे गवशे आपले रिकामपण कारणी लावण्यासाठी भिरभिरत्या आणि आसुसलेल्या नजरेनं अनेक रिकामटेकडय़ांचा हा उद्योग बघत फिरू लागतात. फिरता फिरता ग्रंथ विक्रीच्या मंडपात येतात. एकेक ग्रंथ हाती घेतात, न्याहाळतात आणि भिरकावून देतात. आता
आपलं रिकामपण संपत आलं याची जाणीव होताक्षणी तिथून काढता पाय घेऊ लागतात; पण जाताजाता एक मात्र म्हणून जातात, ‘काय रे हा रिकामटेकडय़ा लोकांचा उद्योग? कशासाठी इतकी भराभरा आणि बदाबदा पुस्तकं लिहितात, हजारो पानांच्या कादंब:या खरडतात, दुसरा काही कामधंदा नाही का? नसेल तर शोधा आणि करा ना तो. कशाला उगाच पुस्तकामागं पुस्तकं प्रसवण्याचा हा रिकामटेकडा उद्योग करीत राहता आणि आम्हाला मात्र नसता ताप करून ठेवता’?
ता.क. नेमाडे सरांनी त्यांच्या भात्यातील एक बाण सा.सं.च्या दिशेने तर दुसरा विंग्रजी शाळांच्या दिशेने सोडला, हेदेखील बरेच झाले म्हणायचे. मराठी एके मराठी. अर्धवट काही नको. कारण या अर्धवटपणाचा फटका कोणा अन्याला नव्हेतर खुद्द नेमाडे सरांनाच काही वर्षापूर्वी बसला होता की. सरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हांचा किस्सा. एका विंग्रजी वृत्तसंस्थेतील अर्धवट भाषाज्ञान असलेल्या बातमीदाराने बातमी लिहिताना, ‘खोकलाकार भालचंद्र नेमाडे’ असा उल्लेख बातमीच्या सुरुवातीलाच केला आणि विंग्रजी वाचणारांसाठी अधिकचे स्पष्टीकरण म्हणून ‘खोकला’ या शब्दाच्या पुढे कंसात ‘कफ’ या शब्दाचीही योजना केली. जर हा बातमीदार लहान असतानाच विंग्रजीच्या शाळा मोडीत काढल्या गेल्या असत्या आणि मराठीतून मराठी भाषा शिकला असता, तर झाला असता असा घोटाळा?