जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते मुस्लिमांचे काय होणार?

By Admin | Updated: October 11, 2014 05:51 IST2014-10-11T05:51:33+5:302014-10-11T05:51:33+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हात धरून राज्यात भाजपाने पाळेमुळे रोवली. मात्र; संधी मिळताच सत्तेसाठी शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तोडली.

What will happen to Muslims who are not Balasaheb? | जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते मुस्लिमांचे काय होणार?

जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते मुस्लिमांचे काय होणार?

अमरावती : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हात धरून राज्यात भाजपाने पाळेमुळे रोवली. मात्र; संधी मिळताच सत्तेसाठी शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तोडली. त्यामुळे जे बाळासाहेबांचेच झाले नाहीत, ते भाजपावाले मुस्लिमांचे कदापि होणार नाहीत, अशी खरमरीत टीका उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर येथील काँग्रेस नेते इमरान मसूद यांनी केली.
अ‍ॅकॅडमिक स्कूलच्या प्रांगणात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मसूद बोलत होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान मोदी हे मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. मुजफ्फरनगर येथे जातीय दंगली घडविण्यात अमित शहा यांचाच हात होता. त्यावेळी मुस्लिमांना ईद साजरी करु देणार नाही, असा फतवा अमित शहा यांनीच काढला होता. मात्र, उत्तर प्रदेशातील काही हिंदू बांधवांच्या मदतीने मुस्लिमांनी ईद साजरी करुन शहांना उत्तर दिल्याचे ते म्हणाले.
भाजपावाले आता मदरशात आतंकवादी प्रशिक्षण देत असल्याचा आरोप करीत आहेत. परंतु मोदींनी देशभरातील कोणत्याही मदरशाची तपासणी करावी, तसे काही आढळल्यास मुस्लिम जबाबदार राहतील, असे ते म्हणाले.
मुस्लिमांच्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्या संघ परिवारातील एकाने तरी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले काय? असा सवाल करीत, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू, मुस्लिमच आघाडीवर होते. संघ परिवार केवळ ब्रिटिशांशी हातमिळवणी करण्यात मश्गुल होता, असा आरोप करून ते म्हणाले, भाजपाकडे महापुरुष नाहीत, त्यामुळे ते काँग्रेसकडे असलेले महापुरुष उसने घेत असून नरेंद्र मोदी हे महापुरुषांच्या नावे विविध योजना सुरु करीत आहेत.
भाजपा आणि संघ परिवार मुस्लिमांना संपविण्याचे कटकारस्थान रचत आहेत. मुस्लिम समाज धर्मांधशक्तींना कधीही खतपाणी घालणार नाही, हे सांगताना येत्या विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: What will happen to Muslims who are not Balasaheb?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.