प्रेमासाठी काय पण...; होकारासाठी बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 05:52 IST2017-01-07T05:52:23+5:302017-01-07T05:52:23+5:30

प्रेम मिळविण्यासाठी प्रेमीयुगुलं विविध प्रकारच्या शक्कली लढवतात.

What for love but ...; Make up for acceptance | प्रेमासाठी काय पण...; होकारासाठी बनाव

प्रेमासाठी काय पण...; होकारासाठी बनाव


मुंबई : प्रेम मिळविण्यासाठी प्रेमीयुगुलं विविध प्रकारच्या शक्कली लढवतात. प्रेयसी घटस्फोटिता आणि सहा वर्षाने मोठी असल्याने प्रियकराचे कुटुंबीय लग्नासाठी नकार देत होते. होकार मिळविण्यासाठी प्रेयसीने स्वत:वरच हल्ला चढविला. पोलिसांपासून वाचण्यासाठी तिने अनोळखी इसमाने हल्ला चढविल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री ताडदेव परिसरात उघडकीस आला आहे. ताडदेव पोलिसांनी शिताफीने कारवाई करीत या हल्ल्याचा बनाव अवघ्या २४ तासांच्या आत उलगडला आहे.
ताडदेव येथील एम. पी. मिल परिसरात २९ वर्षांची प्रियांका हेतपुरे पाच वर्षांच्या मुलासोबत आईकडे राहते. येथील एसी मार्केटमध्ये ती सेल्स एक्झिक्युटीव म्हणून काम करते. गुरुवारी रात्री साडे सातच्या सुमारास महालक्ष्मी रेसकोर्स परिसरातून परतत असताना तिच्यावर हल्ला झाल्याच्या माहितीने एकच खळबळ उडाली. तिला तत्काळ नायर रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ, वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांच्यासह सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. बंगळुरूमधील तरुणीचे छेडछाडीचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईतही ही घटना घडल्याने सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली. तसेच वरिष्ठांकडूनही दबाब वाढला.
सुर्वे यांनी सर्च आॅपरेशन सुरू केले. परिसरातील सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली. मध्यरात्री ३ वाजेपर्यंत पोलिसांची चौकशी सुरू होती. तरुणीला घेऊन आलेल्या मुलाकडे पोलिसांनी विचारणा केली. त्यानंतर तरुणीचाही जबाब नोंदविण्यात आला. मात्र दोघांच्याही जबाबात विसंगती आढळून आल्याने सुर्वेंना संशय आला. त्यामुळे त्यांनी तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडे उलटतपासणी करण्यास सुरुवात केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने या हल्ल्याच्या नाट्याला वाचा फोडली.
घटस्फोटानंतर प्रियांका माहेरी राहण्यास आली होती. याचदरम्यान प्रियांकाला संदीप काशिनाथकरचा आधार मिळाला. संदीप कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्यांच्यातले हेच नाते प्रेमात रूपांतरित झाले. मात्र संदीपच्या कुटुंबीयांना ते मान्य नव्हते. दोघांच्या वयांमधील अंतर त्यात प्रियांका घटस्फोटिता म्हणून त्यांनी नकार दिला. त्यातच काही दिवसांनी संदीपही तिला टाळत होता. तर प्रियांका त्याच्याशीच लग्न करण्याचा हट्ट धरून होती. गुरुवारी रात्री कामावरून सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे ते दोघे भेटले. तिने त्याला लग्नाबाबत विचारले. मात्र त्याने तिला कुटुंबीयांपुढे आपण काय करू शकतो असे सांगितले. होकार मिळविण्यासाठी प्रियांकाने फळ कापण्यासाठी बॅगेत ठेवलेल्या चाकूने गळ्याखालील भागात वार केले. यात घाबरलेल्या संदीपने तिला समजावले. या प्रयत्नामुळे शिक्षा होऊ शकते ही बाब त्याने तिला सांगितली. तिला पटली. म्हणून दोघांनीही हल्ला झाल्याचा बनाव करण्याचे ठरविले. जेणेकरून कुटुंबीयांकडून सहानुभूती मिळेल शिवाय भीतीपोटी लग्नासाठी होकार देतील असे दोघांना वाटले. यातूनच हा बनाव केल्याचे संदीपने पोलिसांना सांगितले. अखेर या गुन्ह्याचा उलगडा होताच, प्रियांकाचाही पुन्हा जबाब नोंदविण्यात आला. तिनेही या बनावाच्या वृत्ताला दुजोरा
दिला. (प्रतिनिधी)
>काही तासांतच गूढ उकलले
वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांच्या पथकाने अवघ्या काही तासांतच या हल्ल्याचे गूढ उलगडल्याने त्यांचे पोलीस दलातून कौतुक होत आहे. या प्रकरणी दोघांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. कायदेतज्ज्ञांकडून माहिती घेत पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांनी दिली.

Web Title: What for love but ...; Make up for acceptance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.