कुख्यात बावाजीचा सन्मान कशासाठी ?
By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:54:42+5:302014-08-17T00:54:42+5:30
उपराजधानीत काही दिवसांपूर्वी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमातील ‘हे‘ छायाचित्र आहे. या छायाचित्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मत्री सतीश चतुर्वेदी दिसत आहे. त्यांच्या शेजारी नागपुरातील

कुख्यात बावाजीचा सन्मान कशासाठी ?
थेट मुख्यमंत्र्यांसोबतच मंचावर : फोटोही काढले
नरेश डोंगरे - नागपूर
उपराजधानीत काही दिवसांपूर्वी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमातील ‘हे‘ छायाचित्र आहे. या छायाचित्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मत्री सतीश चतुर्वेदी दिसत आहे. त्यांच्या शेजारी नागपुरातील कुख्यात जुगार अड्डा चालक अशोक बावाजी ऊर्फ अशोक यादवही दिसत आहे. कुख्यात बावाजीच्या जुगार अड्ड्यावर अलीकडेच पोलिसांनी मोठी धाड टाकली.
या धाडीत सव्वासहा लाख रुपये सापडले. जुगार खेळताना काही ‘मोठ्या‘ लोकांनाही पकडण्यात आले. यात बिल्डर, नगरसेवकाचाही समावेश आहे. अलीकडच्या काळातील नागपुरातील ही मोठी कारवाई आहे. अशोक बावाजी या कुख्यात जुगार अड्डा चालकाला कुणी हात लावायची हिंमत करीत नव्हते. मात्र,पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार आणि त्यांच्या चमूने कुख्यात बावाजीला दणका दिला.
नेत्यांनी विचार करायला हवा
बावाजीला कुणी हात लावू शकत नाही, असे राजकीय क्षेत्रात नेहमीच बोलले जायचे. याचे कारण ‘अशा छायाचित्रात’ दडलेले आहे. मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसोबत यायचे, छायाचित्र काढून घ्यायचे आणि अप्रत्यक्षरीत्या आपल्या अवैध धंद्यांना संरक्षण मिळवायचे, असे या बावाजीचे धंदे आहेत. ज्या व्यक्तीची आपण मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून देत आहोत ती सज्जन की दुर्जन, याचा विचार स्थानिक नेत्याने केला पाहिजे. या घटनेत तसे झालेले दिसत नाही. बावाजीची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून देणे ही या स्थानिक नेत्याची मजबुरी असावी.यामुळे मुख्यमंत्री आणि पक्षाची बदनामी होत आहे, याची जाणीव स्थानिक नेत्याने ठेवायला हवी. (प्रतिनिधी)
राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे, असे सर्वत्र बोलले जाते. गुन्हेगारांना राजकीय पक्ष निवडणुकीत उभे करतात आणि ते निवडूनही येतात. हाच कुख्यात अशोक बावाजी उद्या चुकून नगरसेवक किंवा आमदार झाला, तर दोष कुणाला द्यायचा ?