मनीषा म्हात्रे | उपमुख्य उपसंपादक
कोणताही सण असो वा सामाजिक तणाव, पहिला बंदोबस्त असतो तो पोलिसांचा! त्यांना रजा आहेत, पण त्यांनी त्या घ्याव्या तरी कधी, असा प्रश्न आहे. नवीन वर्ष आले की, या रजा रद्द होतात. गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, मुंबईतील मराठा आंदोलन आणि आता पुढे नवरात्र.... एकामागोमाग एक सार्वजनिक सण-उत्सव, कार्यक्रम आणि आंदोलने आणि या सगळ्यांच्या बंदोबस्तात राबणारे पोलिस आठ तासांच्या ड्युटीची अपेक्षा धरून आहेत.
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
५५,००० पोलिसबळ मुंबईत
१,८०,००० पोलिसबळ राज्यात
१२ : पूर्वीच्या नैमित्तिक रजा
२० : आताच्या नैमित्तिक रजा
७२ तास : मुंबईतील मराठा आंदोलनादरम्यान पोलिसांची सलग ड्युटी
(सण-उत्सवातील परिस्थितीत रजा रद्द होतात. साप्ताहिक सुट्टी मिळत नाही.)
...म्हणून उपक्रमाला ब्रेक
अंमलदार हा पोलिस दलाचा कणा मानला जातो. मात्र, पोलिस दलात अधिकारी आणि कर्मचारी असा भेद असल्याने अंमलदारांना मिळणाऱ्या सवलती अधिकारीवर्गास मान्य नसतात, असे काही पोलिस शिपायांना वाटते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की, मधल्या काळात शिपायांच्या मंजूर पदांपेक्षा आठ ते दहा हजार पदे रिक्त होती. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण होता. मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी पुन्हा सुरू करता येईल.
आरोग्यावरील परिणाम :
पोलिसांमध्ये हृदयविकाराच्या, मानसिक आजारांच्या घटना वाढल्या आहेत. झोपेचा अभाव, सततचा तणाव, कुटुंबापासून दूर असणे याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. बहुतांश पोलिस फौजफाटा हा बंदोबस्तासाठी कुठे ना कुठे तैनात असतो. त्यात, पोलिस ठाण्यातील नियमित जबाबदारी, तपासाचा भारही त्याच्याच खांद्यावर असतो.
अशी लागू झाली होती ड्युटी...:
हवालदार रवींद्र पाटील यांनी पोलिसांना ८ तास ड्युटीचा प्रस्ताव २०१६ मध्ये पहिल्यांदा तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना सादर केला. पुढे, पडसलगीकर यांनी सुरू केलेला ८ तास ड्युटी, १६ तास आराम हा प्रयोग यशस्वी ठरला होता. २० पोलिस ठाण्यांमध्ये तो अमलात आणला गेला. यामुळे पोलिसांमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली होती. कोरोनानंतर हा उपक्रम थांबवण्यात आला.
.... वर्षात ५८ दिवस जास्त काम :
कोरोना संकट दूर होताच तत्कालीन आयुक्त संजय पांडे यांनी २०२२ मध्ये हा उपक्रम पुन्हा सुरू केला. मात्र, पांडे आयुक्तपदावरून दूर होताच तो बंद पडला. सरकारला पाठवलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत, एक पोलिस अधिकारी दरवर्षी सरासरी ५८ दिवस व इतर पोलिस त्याहून अधिक दिवस काम करतात.