‘बालकुमार’ला सापत्न वागणूक का?
By Admin | Updated: February 12, 2015 03:23 IST2015-02-12T03:23:38+5:302015-02-12T03:23:38+5:30
अखिल भारतीय साहित्य तसेच नाट्यसंमेलनाला राज्य शासनाकडून अर्थसाह्य दिले जाते. मात्र मराठी बालकुमार साहित्य संमेलन भरविताना

‘बालकुमार’ला सापत्न वागणूक का?
पुणे : अखिल भारतीय साहित्य तसेच नाट्यसंमेलनाला राज्य शासनाकडून अर्थसाह्य दिले जाते. मात्र मराठी बालकुमार साहित्य संमेलन भरविताना आयोजकांना पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे या संमेलनालाच सापत्न वागणूक का दिली जाते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बालकुमार साहित्य संमेलनाचे यंदाचे २६वे वर्ष असून, केवळ कोकणमधील ओणी गावात मधुमंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संमेलनाव्यतिरिक्त इतर वेळी शासनाकडून कोणताही निधी मिळालेला नाही. किमान ५ लाख रुपयांचा निधी मिळावा यासाठी बालकुमार साहित्य संस्थेकडून गेल्या वर्षी साहित्य संस्कृती मंडळासह शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र त्याला उत्तर मिळाले नसल्याची खंत संस्थेचे प्रमुख कार्यवाह सुनील महाजन यांनी व्यक्त केली.
कोणतेही संमेलन आयोजित करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. मात्र दरवर्षी बालकुमार साहित्य संस्थेचे पदाधिकारी आणि निमंत्रित संस्था निम्मा निम्मा खर्च उचलून संमेलनाचा गाडा पुढे नेत आहेत. आम्ही काम करणे थांबवले तर बालकुमार साहित्य संमेलन बंद होईल, ते बंद झाले तर ग्रामीण भागात जिथे संमेलन भरविले जाते तेथील मुले दर्जेदार बालसाहित्यापासून वंचित राहातील. मुलांमध्ये साहित्याची गोडी लागावी हा मुख्य उद्देश आहे, असे ते सांगतात. संमेलनाला थोडातरी निधी मिळावा ही अपेक्षा करणे चुकीचे आहे का? असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)