राणेंनी सत्तेत असताना काय केले?
By Admin | Updated: January 12, 2016 00:35 IST2016-01-11T23:28:57+5:302016-01-12T00:35:20+5:30
राजन तेली : मच्छिमारांचा प्रश्न समजायला आठ वर्षे लागली का?

राणेंनी सत्तेत असताना काय केले?
सावंतवाडी : नारायण राणे यांनी सरकारवर टीका करण्यापेक्षा आपण सत्तेत असताना काय केले, हे जनतेला सांगावे. नुसती टीका करून जनतेची दिशाभूल करू नये. राणेंना मच्छिमारांचा प्रश्न समजायला आठ वर्षे लागली का, असा सवाल माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे. जिल्ह्यातील समस्यांबाबत १२ जानेवारीला मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत त्यांना माहिती देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष मनोज नाईक, माजी तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर, शहरअध्यक्ष आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
माजी आमदार राजन तेली म्हणाले, जिल्ह्यात काँगेस आघाडीच्या काळात सी-वर्ल्ड प्रकल्प आला, पण तो सुरू झाला नाही. खडी, वाळू, चिरे यावर पूर्णत: बंदी होती. जिल्ह्यात विकासाचा एकही प्रकल्प आला नाही. असे असताना युतीचे सरकार आल्यावर वाळू, चिरे व खडी यावरची बंदी आम्ही पूर्णत: उठवली. सी-वर्ल्ड प्रकल्प सुरू होण्यासाठी सरकारने बैठका घेतल्या आहेत. विमानतळाचे काम या वर्षअखेर पूर्ण होईल. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम भाजप सरकारनेच हाती घेतले आहे. त्यामुळे सरकारवर नाहक टीका नको. जर सत्य असेल, तर ते विरोधी पक्षाने मांडले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.
जिल्ह्यात गेली अनेक वर्षे मच्छिमारांचा प्रश्न असून, तो काँग्रेसला कधी दिसला नाही. मात्र, युती सरकारने हा प्रश्न सोडवताच राणे यांना हा प्रश्न आठवला, असे सांगत सरकारने सोडवलेल्या प्रश्नांचे श्रेय कोणी घेऊ नये. मत्स्यमंत्री एकनाथ खडसे यांनीच हा प्रश्न सोडवला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात खडी, वाळू व चिरे उपसा अधिस्थगन उठल्यानंतर सुरू झाले. मात्र, प्रशासन चुकीची भूमिका घेऊन डंपरचालकांना त्रास देत आहे, हे योग्य नाही.
पोलिसांकडे सर्व खात्याचा कारभार दिला आहे का? जिकडे तिकडे डंपर अडवण्याचे काम पोलीस करीत आहेत. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सर्व घटनांची माहिती दिली आहे. यावर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा आम्हाला वेगळ्या पध्दतीने बंदोबस्त करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
१२ जानेवारीला भाजपचे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, या भेटीत त्यांनी जिल्ह्यातील प्रशासनाची सर्व माहिती देणार आहेत. प्रशासन जनतेला कशा प्रकारे त्रास देत आहे, याची माहिती त्यांना देण्यात येणार आहे. विशेषत: जनतेचा पोलिसांबाबत विशेष राग असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
पालकमंत्री दीपक केसरकर यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळेच अधिकारी कोणाचे ऐकत नाहीत. मनाला वाटेल तसा कारभार करतात. सध्या ‘नियोजन’चा निधी पडून आहे. तो खर्च केव्हा होणार, याची कोणालाच माहिती नाही. याबाबत आम्ही पालकमंत्र्यांसह प्रशासनाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.