निसर्गऱ्हासमुळे उदभवले महापुराचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:49 AM2019-08-16T00:49:42+5:302019-08-16T00:52:53+5:30

जागतिक तापमानवृद्धी व त्याच्याशी निगडित हवामान, त्याला लाभलेली मानवी चुकांची साथ यामुळे निसर्गचक्र बदलते आहे आणि बदलत्या चक्रामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना आपण सध्या सामोरे जात आहोत. नै

what is a caused of floods | निसर्गऱ्हासमुळे उदभवले महापुराचे संकट

निसर्गऱ्हासमुळे उदभवले महापुराचे संकट

googlenewsNext



- डॉ. उदयकुमार पाध्ये

जागतिक तापमानवृद्धी व त्याच्याशी निगडित हवामान, त्याला लाभलेली मानवी चुकांची साथ यामुळे निसर्गचक्र बदलते आहे आणि बदलत्या चक्रामुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना आपण सध्या सामोरे जात आहोत. नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर, वादळं, वणवे, ढगफुटी. यात मानवी चुकांबरोबरच अविचारी हस्तपेक्ष, चंगळवाद, बेफिकिरी यांचाही बराचसा वाटा आहे. विकासाच्या नावाखाली या सर्व गोष्टी जरी होत असल्या तरी त्या अविवेकीपणाने होताहेत आणि त्याचा नैसर्गिक परिसंस्था, जैवविविधता व ऋतुचक्रावर परिणाम होतोय. अविचाराने केलेल्या कृतींना निसर्ग कधीही माफ करीत नाही हेही तितकेच खरे आहे.

वद्भूमंडलं धत्ते सशैलवनकाननम।
तावत्तिष्ठती मेदिन्यां संतति: पुत्रपौत्रिकी।।
- वराहपुराण
जोपर्यंत या धरतीवर पर्वत, वने व उद्याने आहेत, तोपर्यंतच तुम्ही, तुमची मुलं, नातवंडं वगैरे सुखाने जगतील, अशा अर्थाची संस्कृत वचनं सुमारे २५,००० वर्षांपूर्वीच्या नित्यपठणात येत होती. यावरून आपल्या पूर्वजांना पर्यावरणाचं महत्त्व व निसर्गरक्षणाची आस किती तीव्र होती, हे सहज लक्षात येतं. केवळ आर्थिक व राजकीय लाभाने प्रेरित विकास, अंदाधुंद वृक्षतोड, डोंगर सपाटीकरण, नद्यांचे प्रवाह बदलणे, अवाढव्य धरणांची बांधकामे, कांदळवनांची कत्तल, सिमेंटचं जंगलीकरण व रासायनिक शेती, बागायती इ.ना जन्म देतो. अर्थात, अविचारात केलेल्या या कृतींना निसर्ग माफ करत नाही, हेही तितकेच खरे आहे. नुकत्याच देशभरात आलेल्या पूरस्थितीमुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येऊ पाहत आहे. एका बाजूनं तापमानात प्रचंड वाढ व दुसरीकडून अतिवृष्टी असं शहरी, ग्रामीण जीवनाबरोबरच संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात आलीय. निसर्गसंगत जीवनशैलीपासून फारकत घेतल्यामुळे सृष्टीकर्त्याने दिलेली ही शिक्षा आहे.
भारतात होणाºया बºयाचशा नैसर्गिक वाटणाºया आपत्ती या मुळात मानवनिर्मित आहेत. पण, त्याचं स्वरूप व परिणाम आपल्यासमोर असले, तरी नेमका कार्यकारणभाव आपल्यासमोर आणला जात नाही. क्वचित, कुणी प्रयत्न केल्यास माध्यमांच्या जोरावर त्याचा बुद्धिभेदही केला जातो, हे नुकत्याच आलेल्या सांगली, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, वायनाड, कुन्नर येथील महापुरांवरून स्पष्ट होत आहे. या पर्यावरणहानीत सर्वात मोठा वाटा आहे, तो जंगलतोडीचा. ब्रिटिशांनी अठराव्या शतकात हिंदुस्थानात पाय रोवले. त्यांच्या काळात, तसंच ब्रिटिश निघून गेल्यावर आपणही सलग १०० वर्षे जंगलांची अंदाधुंद तोड केली.
इ.स. १८५३ मध्ये हिंदुस्थानात रेल्वेलाइन टाकली गेली. यासाठी पश्चिम व पूर्व घाटात जंगलतोड झाली. ही जंगलं संपल्यावर हिमालयाच्या आसपास असलेल्या सपाटीच्या क्षेत्राकडे जंगलतोड्यांची नजर वळली. त्यानंतर, पहाडी भागातली वनेही नष्ट करण्यात आली. हे होत असतानाच जर्मन निसर्गतज्ज्ञ बॅडिसन याने यासंबंधी कठोर नियम केले. अर्थात, ते सोयीसवयीनुसार पाळले गेले नाहीत व आपला देश अक्षरश: उजाड झाला. त्यातूनही वाचलेला जंगलभाग नष्ट करण्याचं काम अजूनही अविरतपणे सुरूच आहे. इ.स. १८७८ मध्ये नवीन जंगल कायदा बनला व इ.स. १९०० साली संरक्षित वन फक्त ८,४०० वर्ग किमी उरलं. याचाच अर्थ फक्त १० वर्षांत ते एक पंचमांश उरले.
इथल्या कारभाराचा खर्च इथल्या उत्पन्नात भागवून व सत्ता टिकवण्यासाठी जंगल खात्याची स्थापना केली गेली. जंगलाचे कायदे व जंगलखाते हे निव्वळ ब्रिटिशांच्या फायद्यासाठी होते. आपणही ही परंपरा कमीअधिक प्रमाणात सुरूच ठेवली व जंगलाबरोबर, डोंगरांचे सपाटीकरण, मातीचे थर, खाड्या, खाजणं यांचे बुजवणे हे चालू ठेवले. भूजलाची पातळी भूपृष्ठाजवळ ठेवणारी निसर्गाची सक्षम योजनाच बंद पाडली. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची बोंब व पावसाळ्यात ढगफुटी व अतिवृष्टीचे बळी ठरलो. कारण, जंगल नष्ट झाल्यामुळे वाढणारी उष्णताही समुद्रातील पाण्याची अधिक प्रमाणात बाष्पीभवन करून ढगात पाण्याचे प्रमाण अधिक होते. परिणामी, पावसाचा अतिरेक होतो.
समुद्र वा खाडीलगत वाढणारी समशीतोष्ण प्रदेशातील विशिष्ट प्रकारची जंगलं म्हणजे खारफुटी वा कांदळवनं होत. भारतात ४४४८ चौ. कि.मी. खारफुटी क्षेत्र असून जमिनीची धूप, त्सुनामी थांबवणारे मासे व सूक्ष्मजीवांचे संरक्षक असं हे कवच आपण जाणूनबुजून कमकुवत केलंय. पाऊस पडणे ही नैसर्गिक घटना आहे. पण, तो पाऊस किती पडणार, ही घटना मात्र निसर्गचक्रातला मानवी हस्तक्षेप दाखवते. वातावरणातील ढगांमध्ये वाफेचे द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब म्हणजेच पाऊस पडतो. हवा थंड झाल्यामुळे वा उष्णतेमुळे आर्द्रता अधिक वाढल्यामुळे पाऊस पडतो.
दरवर्षी पृथ्वीवर ५०५,००० घनकिमी पाऊस पडतो, असे मानतात. त्यातील ७५ ते ८० टक्के पाऊस समुद्रातच पडतो. अधिक आर्द्रतेमुळे तसेच अतिआर्द्रतेमुळे अधिक पडणारा पाऊस तसेच समुद्रावरील पाऊस जमिनीवर पडल्यानं अतिवृष्टी वा उंच पर्वतरांगांनी ढग अडविल्यामुळे ढगफुटीसारखे प्रकार वारंवार होतात. यामुळेच धरणांमध्ये पाण्याचा अतिरेकी साठा होऊन पाण्याचा विसर्ग करावा लागतो. नद्यांचे प्रवाह बदलल्यामुळे, भराव टाकल्यामुळे, गाळानं भरल्यामुळे तसेच पाणलोट क्षेत्रात तसेच नदीच्या पात्रात केलेल्या अविचारी बांधकामांमुळे नद्यांमधील पाणी वस्तीत/ शहरात घुसते. यामुळे होणारी हानी आपण गेले काही दिवस पाहतच आहोत.
समुद्रामधली तसेच जंगलामधील जैवविविधता वाचवून त्याचा पर्यटनवाढीसाठी उपयोग करता येईल. यामुळे रोजगार व उत्पन्न वाढून संपन्नता येईल. पण, आपण त्याऐवजी तेलशुद्धीकरण, रसायननिर्मिती, औद्योगिक क्षेत्रात वाढ, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर करून पृथ्वीला ओरबडत जखमी करत आहोत आणि दैनंदिन आयुष्यात त्याच्या शिक्षाही भोगत आहोत. सन १७८४ मध्ये भरावाला अटकाव करणारं पत्र लपवून ठेवणाºया व मुंबईला विध्वंसाकडे नेण्याची सुरुवात करणाºया रॉबर्ट क्लाइव्हला इंग्लंडमध्ये शिक्षा झाली. पण, आज इथे असे आपल्याला एखादे तरी उदाहरण दाखवता येईल का?
तसं पाहता मागील १०० वर्षांत आपण पूर, दुष्काळ, त्सुनामी, भूकंप अशा अनेक आपत्तींना सामोरे गेलेलो आहोत. विकास करत असलो तरी अविवेकीपणे. हे लक्षात घेत विकास आणि विनाश यातील रेषा अत्यंत बारकाईने निरखावी लागेल, हेच खरे.
 

Web Title: what is a caused of floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर