मकर संक्रांत म्हणजे काय?
By Admin | Updated: January 14, 2016 16:15 IST2016-01-14T15:55:57+5:302016-01-14T16:15:33+5:30
सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात. मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो.

मकर संक्रांत म्हणजे काय?
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा आनंदाचा व उपभोगाचा सण मानला जातो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत या दिवशी असतो.
हा सण माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह व माधुर्य हवे, असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. तिळगूळ देताना ’तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणण्याची पद्धत एकमेकांमधीव स्नेह वाढवतो. भारतातील बहुतेक सर्व भागांतून हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळुआ संक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. पहिल्या दिवशी इंद्राप्रीत्यर्थ भोगी पोंगळ वा इंद्रपोंगळ, दुसऱ्या दिवशी सूर्याप्रीत्यर्थ सूर्यपोंगळ आणि तिसऱ्या दिवशी गायीसाठी मट्टपोंगळ साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान आणि दान पुण्यदायी मानले आहे. त्या दिवशी प्रयाग, गंगासागर इ. ठिकाणी प्रचंड मेळे भरतात.