पश्चिम रेल्वे धडाडली...
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30
अखिल भारतीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेच्या ‘ब’ गटात विजयी घोडदौड कायम राखताना, कॉम्पट्रलर आॅडिटर जनरल (सीएजी) संघाचा ३-० असा धुव्वा उडवला.

पश्चिम रेल्वे धडाडली...
मुंबई : बलाढ्य पश्चिम रेल्वेने १२व्या गुरुतेगबहादूर अखिल भारतीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेच्या ‘ब’ गटात विजयी घोडदौड कायम राखताना, कॉम्पट्रलर आॅडिटर जनरल (सीएजी) संघाचा ३-० असा धुव्वा उडवला. त्याचप्रमाणे, फूड कॉर्पोरेशन इंडिया (एफसीआय) आणि पंजाब नॅशनल बँक या संघांनी आपापल्या सामन्यात बाजी मारत विजयी कूच केली.
चर्चगेट येथील हॉकी स्टेडियमवर झालेल्या लढतीत पश्चिम रेल्वेने सुरुवातीपासून केलेला आक्रमक खेळ अखेरपर्यंत कायम राखताना, सीएजी संघाला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. अमित रोहिदार याने तिसऱ्याच मिनिटाला वेगवान गोल करून रेल्वेला आघाडीवर नेले. ही आघाडी रेल्वेने पहिल्या डावात कायम राखून मध्यंतराला १-० असे वर्चस्व राखले.
यानंतर, पुन्हा एकदा अमितने सीएजीच्या गोलक्षेत्रात आक्रमक मुसंडी मारताना संघाचा दुसरा गोल करून, रेल्वेला २-० असे आघाडीवर नेले. या वेळी सीएजीने जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वेच्या भक्कम बचावापुढे त्यांचा निभाव लागला नाही. त्यातच अय्याप्पाने ५३व्या मिनिटाला गोल करुन, पश्चिम रेल्वेच्या विजयावर शिक्का मारला. रेल्वेच्या भक्कम बचावफळीपुढे सीएजीच्या एकाही आक्रमकाला गोल करण्यात यश आले नाही.
यानंतर झालेल्या ‘अ’ गटाच्या एकतर्फी लढतीत एफसीआयने धडाकेबाज विजय मिळवताना, मुंबई कस्टम्सचा ८-४ असा फडशा पाडला. आकाश पवार आणि मिथिलेश
कुमार यांनी प्रत्येकी २ गोल करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले, तर प्रिथिराज सोळंकी, विजय वाल्मिकी, इम्रान खान आणि विनोद मनुगुडे यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाच्या विजयात हातभार लावला. मध्यंतरालाच एफसीआयने ४-० अशी जबरदस्त आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला, तर पराभूत मुंबई कस्टम्सकडून जयेश जाधव व राहुल सिंग यांनी प्रत्येकी २ गोल करून संघाचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला. (क्रीडा प्रतिनिधी)
पीएनबी विजयी
‘ब’ गटात झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पंजाब नॅशनल बँकने मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना युनियन बँक आॅफ इंडियाचे कडवे आव्हान ३-२ असे परतावले. संजय एस. याने २ गोल करून संघाच्या विजयात निर्णायक कामगिरी केली, तर गगनदीप सिंगने एक गोल करताना संजयला चांगली साथ दिली. युनियन बँकेकडून हरजीत सिंग व विनित शेट्टी यांनी प्रत्येकी एक गोल करताना, संघाचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला.