जळगावात ‘तनय मल्हारा’चे जल्लोषात स्वागत
By Admin | Updated: September 27, 2016 23:57 IST2016-09-27T23:57:23+5:302016-09-27T23:57:23+5:30
स्टार प्लस वाहिनीवरील डान्स प्लस २ या नृत्यस्पर्धेत विजेता ठरलेल्या १४ वर्षीय जळगावचा दुलारा तनय मल्हाराचे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगावात आगमन झाले.

जळगावात ‘तनय मल्हारा’चे जल्लोषात स्वागत
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २७ : स्टार प्लस वाहिनीवरील डान्स प्लस २ या नृत्यस्पर्धेत विजेता ठरलेल्या १४ वर्षीय जळगावचा दुलारा तनय मल्हाराचे मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगावात आगमन झाले. सजविलेल्या वाहनासह काढण्यात आलेल्या स्वागत रॅलीला जोरदार प्रतिसाद लाभला. जळगावकरांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. तनयची छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी विद्यार्थी व तरुणांनी एकच गर्दी केली होती.
खान्देश सेंट्रलपासून निघाली मिरवणूक
तनय मल्हारा विजेता झाल्यानंतर त्याचे मंगळवारी दुपारी ३ वाजता जळगाव रेल्वे स्टेशनवर आगमन झाले. त्यानंतर एका वाहनाने तनय व त्याचे पालक खान्देश सेंट्रल मॉलजवळ पोहचले. त्या ठिकाणी तनयचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर एका सजविलेल्या वाहनावर तनय, आई नलिनी मल्हारा, वडील आनंद मल्हारा यांच्यासह परिवारातील सदस्य दाखल झाले.
उंट, घोडे व सवाद्य मिरवणूक
तनयच्या आगमनानंतर खान्देश सेंट्रल मॉल येथून भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत अग्रभागी अश्वधारी तरुण, उंट तसेच वाद्यपथक सहभागी झाले. त्यापाठोपाठ अनुभूती स्कूलचे विद्यार्थी मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यापाठोपाठ सजविलेल्या वाहनावर तनय व त्याचे कुटुंबीय जळगावकर नागरिकांना अभिवादन करीत होते.
ला.ना.चौकात विद्यार्थिनींची गर्दी
तनयच्या स्वागताची रॅली नेहरू चौक, कोर्ट चौक मार्गे नंदीनीबाई विद्यालयाजवळ आली. या ठिकाणी तनयला पाहण्यासाठी विद्यार्थिनींनी दोन्ही बाजूने गर्दी केली. अनेक विद्यार्थिनी व तरुण आपल्या मोबाईलमध्ये तनयची छबी टिपत होते. तसेच स्वागत मिरवणुकीची छायाचित्रण करीत होते.