वेलकम सी.एम.

By Admin | Updated: November 2, 2014 01:01 IST2014-11-02T01:01:50+5:302014-11-02T01:01:50+5:30

तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहिले आणि आम्हा नागपूरकरांचा ऊर भरून आला़ आपल्या नागपूरचा सुपुत्र महाराष्ट्राचा पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालाय ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी निश्चितच

Welcome cm | वेलकम सी.एम.

वेलकम सी.एम.

प्रति,
माननीय श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सप्रेम नमस्कार,
तुम्हाला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहिले आणि आम्हा नागपूरकरांचा ऊर भरून आला़ आपल्या नागपूरचा सुपुत्र महाराष्ट्राचा पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालाय ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री म्हणून आज आपले उपराजधानीत प्रथमागमन होत आहे, त्यानिमित्त मन:पूर्वक स्वागत.
मुख्यमंत्री महोदय, तुमचे आणि आमचे एक वेगळे ऋणानुबंध आहेत. ‘आपला माणूस’ म्हणून तुमच्यावर आमचा विशेष हक्क आहे आणि म्हणूनच खूप अपेक्षाही आहेत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा नागपूरला महाराष्ट्रात समाविष्ट करुन घेतानाही आमच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु मागील ५४ वर्षांत या अपेक्षांची कधी पूर्तता झालीच नाही. उलट उपेक्षाच आमच्या पदरी पडली़ विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक केवळ उपचाराचा भाग म्हणून पंधरवड्यासाठी इथे घेतले जाते. पण त्यातून फार काही साध्य होत नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपण मुख्यमंत्री झालात, केंद्रात आपल्याच पक्षाचे सरकार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नितीन गडकरी हे लोकविकासाची तळमळ असलेले मंत्री आहेत. त्यामुळे आपण या सर्वांच्या सहकार्याने नागपूरचा सर्वांगीण विकास घडवून आणू शकता. नागपूरचे ‘सिंगापूर’ करण्याच्या गोष्टी यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी केल्या. परंतु त्या घोषणा हवेतच विरल्या.
मिहान प्रकल्प आजदेखील अजगरासारखा सुस्त आहे. आमची मुले उच्चशिक्षण घेतल्यानंतर नागपुरात थांबत नाहीत, कारण त्यांना येथे हवा तसा रोजगार नाही. अशा उच्चशिक्षितांना रोजगार मिळेल असे मोठे प्रकल्प नागपुरात आणता येणार नाहीत का? ‘आयटी हब’ होण्यास वाव असतानादेखील नागपूरमध्ये कंपन्यांचे ‘सर्किट’ जोडले गेलेले नाही. गुळगुळीत रस्त्यांचे शहर ही नागपूरची ओळख इतिहासजमा झाली आहे अन् नागरिकांना अनेक ठिकाणी खड्ड्यांतून रस्ता शोधावा लागत असल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारित खड्ड्यांचा विषय येतो. महानगरपालिकेत आपल्याच पक्षाची सत्ता आहे. याअगोदर या मुद्यावर राज्याकडून सहकार्य मिळत नाही, असे उत्तर देण्यात यायचे. परंतु त्या सबबी आता राहिलेल्या नाहीत. आपण मनात आणले तर महानगरपालिकेच्या पाठीशी उभे राहून नागपुरातील सर्व रस्ते एकाच निर्णयात चकाचक करू शकता. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्रकल्प केवळ भिंती उभारून थांबला आहे तर रामझुल्याचा अजूनही वनवास संपलेला नाही. आमच्या भगिनींना घराबाहेर पडल्यावर रस्त्यांवरुन चालताना भीती वाटते. कधी कुठला गुंड येईल अन् गळ्यातील चेन-मंगळसूत्र झटका देऊन पळवेल याची शाश्वती राहिलेली नाही. हत्यांची शंभरी गाठल्या जातेय, तर महिलांवरील अत्याचारदेखील वाढत आहेत.
मुख्यमंत्री महोदय, आमच्या अपेक्षा फार नाहीत. आकाशातून चंद्र तारे तोडून आणून द्या असेही आम्ही तुम्हाला सांगत नाही. सुंदर, स्वच्छ, सुरक्षित नागपुरात आम्ही राहतो हा अभिमान अधिक उंचाविण्यासाठी ज्या ज्या गोष्टी मुख्यमंत्री म्हणून आपण करू शकता, त्या आपण कराव्यात. एवढे हक्काने सांगण्याचा आमचा आपल्यावर अधिकार आहे. आपण या अपेक्षांची पूर्तता कराल ही खात्रीच नव्हे तर आम्हाला आत्मविश्वासदेखील आहे.
अपेक्षा आणि सदिच्छांसह...
आपले नागपूरकर

Web Title: Welcome cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.