मोकाट कुत्र्यांना आवरा
By Admin | Updated: August 5, 2016 01:00 IST2016-08-05T01:00:07+5:302016-08-05T01:00:07+5:30
महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेने गुरुवारी (दि. ४) सहायक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.

मोकाट कुत्र्यांना आवरा
हडपसर : काळेपडळ येथे डुकरांचा व कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, त्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेने गुरुवारी (दि. ४) सहायक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चातील आक्रमक पदाधिकाऱ्यांनी रुद्रावतार धारण केल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. दोन्ही पक्षांच्या आंदोलनामुळे सहायक आयुक्त कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. आंदोलकांनी प्राण्यांच्या छायाचित्राची प्रतिमा व कुत्र्याचे पिलू अधिकाऱ्यांना भेट दिले.
या समस्येबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही येथे कारवाई होत नसल्याने मनसेच्या हडपसर महिला शहराध्यक्षा कल्पना जाधव, विभागाध्यक्ष साईनाथ बाबर, उपाध्यक्ष अजय न्हावले, विभागाध्यक्षा सुहासिनी कामठे, पूनम भुमकर, मंदा शेडगे, विशाखा गायकवाड, उपाध्यक्ष विशाल ढोरे, आबा धारवडकर, विनोद धुमाळ, अनिल म्हेत्रे, उपविभागाध्यक्षा सविता मोरे, प्रतीक्षा जाधव यांच्या नेतृत्वाखाली हडपसर सहायक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सहायक आयुक्त सुनील गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, डॉ. दिनेश भेंडे यांना आंदोलकांनी प्रश्नांचा भडिमार केला.
‘कारवाई करायचे नाटक नको, प्रत्यक्षात कारवाई करा, नाही तर खुर्च्या खाली करा,’ असा संतप्त इशारा दिल्यावर वराहपालन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, वराह अन्यत्र हलविण्यात येतील, नागरिकांची या प्रश्नातून सुटका करण्यात येईल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
वराहपालन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मोगे घेतले. आंदोलनाचे नेतृत्व अजय न्हावले व इंद्रायणी न्हावले यांनी केले होते. (वार्ताहर)
>काळेपडळ व हडपसर परिसरातील अनेक ठिकाणी डुकरांचा सुळसुळाट वाढला असून त्याबाबत त्यांना दिलेल्या नियोजित जागांवर हे वराह हलवावेत. येत्या काळात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, तर हडपसर सहायक आयुक्त कार्यालय बंद करू.
- अजय न्हावले, मनसे उपाध्यक्ष, हडपसर