५० ठिकाणी भरणार आठवडा बाजार!

By Admin | Updated: September 5, 2016 04:35 IST2016-09-05T04:35:29+5:302016-09-05T04:35:29+5:30

शेतात पिकणारा भाजीपाला थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये ५० आठवडा बाजार सुरू होणार

Weekend market to fill 50 places! | ५० ठिकाणी भरणार आठवडा बाजार!

५० ठिकाणी भरणार आठवडा बाजार!


ठाणे : शेतात पिकणारा भाजीपाला थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये ५० आठवडा बाजार सुरू होणार असून शहरातील कोपरी परिसरात अशा स्वरूपाचा बाजार रविवारपासून सुरू झाला आहे. त्याला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत भाजीपाल्याच्या आठवडा बाजारास प्रारंभ होणार असून त्याविषयीच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पणन तसेच जिल्हा पुरवठा विभागाला केल्या आहेत. आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपरीतील आठवडा बाजाराचे उद्घाटन झाले, त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसह ठाण्याचे महापौर संजय मोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांची भाजी मोठ्या प्रमाणावर आठवडा बाजारात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करून एकनाथ शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात सर्वात जास्त आठवडा बाजार सुरू करून राज्यात एक आदर्श निर्माण करावा, अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. ठाणे जिल्हा प्रशासन आणि राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने कोपरीच्या संत तुकाराम महाराज क्र ीडांगण येथे आजपासून आठवडा बाजार सुरू करण्यात आला. वाजवी दरात थेट शेतातली भाजी मिळत असल्याने पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामध्ये महिलांचा समावेश जास्त होता. या बाजारात डहाणू येथील बारी शेतकरी गट, सेव्हन स्टार, तिवारपाडा, मुरबाड येथून स्वयंसहायता गट, याशिवाय नगर, राहुरी, नाशिकहून शेतकरी भाजी आणि फळे घेऊन आल्याचे आढळले. सध्या गावदेवी मैदान (शनिवार), हिरानंदानी सोसायटी (रविवार), ब्रह्मांड सोसायटी (मंगळवार), साकेतला (रविवार) आणि रविवारी कोपरी, असे ठाणे शहरात ठिकठिकाणी पाच आठवडा बाजार सुरू झाले आहेत. ठाणे मनपाचे मैदान, वर्तकनगर, शिवाजी मैदान, तलावपाळी आणि ठाणे मनपा शाळा ४४, वर्तकनगर या ठिकाणीदेखील बाजार सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणीही लवकरच आठवडा बाजार सुरू करण्याचे नियोजन असल्याचे ठाणे उपजिल्हा निबंधक दिलीप उढाण आणि जिल्हा पणन व्यवस्थापक मोहन गंभीरराव यांनी सांगितले. या बाजारासाठी उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार किसान भदाणे, आत्माचे प्रकल्प संचालक पी.एम. चांदवडे, दीपक कुटे, ठाणे उपविभागीय कृषी अधिकारी अजय पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Weekend market to fill 50 places!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.