वेबसाईटवर अधिका-यांच्या पदांचे ‘तीनतेरा’

By Admin | Updated: January 17, 2015 05:53 IST2015-01-17T05:53:17+5:302015-01-17T05:53:17+5:30

एसटीत भविष्यात मोठे बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महामंडळाने आपल्या वेबसाईटकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे

On the website 'three-party' posts | वेबसाईटवर अधिका-यांच्या पदांचे ‘तीनतेरा’

वेबसाईटवर अधिका-यांच्या पदांचे ‘तीनतेरा’

मुंबई : एसटीत भविष्यात मोठे बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महामंडळाने आपल्या वेबसाईटकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर सध्या कार्यरत असलेल्या आणि नवीन पदे असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जुनीच पदे दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे एकूणच या वेबसाईटवर अधिकाऱ्यांच्या पदांचेच तीनतेरा वाजवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
एसटी महामंडळ हायटेक होण्याच्या दृष्टीने पाऊल टाकत असून, गाड्यांमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना सहजतेने तिकीट उपलब्ध व्हावे यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. यासाठी एसटीच्या वेबसाईटवरही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यावर कामही सुरू आहे. मात्र असे असतानाच हायटेक होण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महामंडळाने आपल्या वेबसाईटकडे दुर्लक्षच केले आहे. एसटीच्या वेबसाईटवर अनेक प्रकारची माहिती देण्यात आली असून, अधिकाऱ्यांची नावे, पदे आणि त्यांच्या फोन नंबरचाही समावेश आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या पदांचे या वेबसाईटवरच तीनतेरा वाजवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यांची पदे बदलली गेली आहेत. असे असतानाही सध्या नवीन पदे भूषवित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एसटीच्या वेबसाईटवर जुनीच पदे दाखविण्यात आली आहेत. व्ही.व्ही. रत्नपारखी हे सध्या वाहतूक महाव्यवस्थापकपदी असून, वेबसाईटवर नियोजन आणि पणनचे उपमहाव्यवस्थापक म्हणून दाखवण्यात आले आहे. तर सु.म. अंबाडेकर हे आता नियोजन आणि पणनचे महाव्यवस्थापक असून, वेबसाईटवर अजूनही वाहतूक विभागाचे महाव्यस्थापक म्हणून दाखवण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राजेंद्र पाटील यांचे पद वेबसाईटवर भांडार आणि खरेदीचे महाव्यवस्थापक म्हणून दाखवण्यात आले आहे. मुळात पाटील हे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त झाले आहेत. या पदावर आर.आर. पाटील कार्यरत आहेत. मात्र आर.आर. पाटील यांचे वेबसाईटवर पद अजूनही कर्मचारी वर्ग आणि औद्योगिक संबंध म्हणून दाखवण्यात आल्याने महामंडळाचा एकूणच सावळागोंधळाचा कारभार उघड झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On the website 'three-party' posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.