मुंबई - महाराष्ट्रातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. अलीकडेच काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. जळगाव, पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबईत पुढील ४८ तासांत पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिक उकाड्याने हैराण झाले होते त्यात वातावरण बदलामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील तापमानात घट पाहायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता नसली तरी ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी यामुळे लोकांना दिलासा मिळेल. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि धुळे जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे. या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस येऊ शकतो. शेतकऱ्यांसह सामान्य लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. पश्चिमी प्रकोप आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे आणि उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे यांचा संगम होत असल्याने वातावरणात बदल झालेला दिसून येत आहे.
काय करावे?
ऑरेंज अलर्ट असणाऱ्या जिल्ह्यात जोरदार वारे आणि पावसामुळे वाचण्यासाठी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. विजांच्या कडकडाटापासून संरक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी राहा. शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचे, गुरांचा चारा योग्य ठिकाणी ठेवावा.
दरम्यान, मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. वाशी आणि आसपासच्या भागात मंगळवारी पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुढील ३६ ते ४८ तासांत शहरात पावसाची शक्यता आहे. कोकणात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. पुणे, पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातही विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात आज १ एप्रिल आणि उद्या २ एप्रिल रोजी ढगाळ वातावरणासह काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्यात सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता अधिक असल्याचेही अंदाजात म्हटले आहे.