हवामान खाते भरकटले!
By Admin | Updated: June 27, 2016 04:57 IST2016-06-27T04:57:27+5:302016-06-27T04:57:27+5:30
बदलत्या हवामानाचा वेध घेण्यात प्रशासकीय यंत्रणाही अपयशी ठरली असून, हवामान खात्याचे अंदाज चुकत आहेत,

हवामान खाते भरकटले!
अहमदनगर : बदलत्या हवामानाचा वेध घेण्यात प्रशासकीय यंत्रणाही अपयशी ठरली असून, हवामान खात्याचे अंदाज चुकत आहेत, असे सांगत हवामान खाते भरकटले आहे, अशी स्पष्टोक्ती कृषी व पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी रविवारी येथे केली.
दुरुस्तीच्या दिशेने सरकार पावले उचलत आहे, अशी सारवासारव त्यांनी केली. जिल्हा कृषी विभाग कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यक्रमात त्यांनी राज्यातील हवामान खात्याने जाहीर केलेले अंदाज आणि पावसावर भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात तीव्र दुष्काळानंतर पावसाला सुरुवात झाली़ हवामान खात्याने एप्रिलमध्ये यंदा २५ ते ३१ टक्के जास्त पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता़ आता हेच हवामान खाते १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करत आहे. म्हणजे ६ टक्केच जास्त पाऊस पडेल, असा त्यांचा अंदाज आहे. एकाच मालकाच्या वाटण्यांचे उदाहरण त्यांनी दिले़ एका वाटणीत जर पाऊस पडला तर दुसऱ्यात पडेलच, असे नाही, असेही ते म्हणाले़
इतर देशांच्या तुलनेत हवामानाचा वेध घेण्यात आपण कमी पडत आहोत़ त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे़ त्यामुळे हवामान खात्यात मोठे बदल करण्यात येणार आहेत. अत्याधुनिक हवामान केंद्र उभारण्याच्या दिशेने सरकार पावले उचलत आहे़ कृषी विभागातील सेवानिवृत्तांची मदत घेतली जाणार आहे़ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर कृषी क्षेत्रासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
‘नीट’मुळे बरेच जण नीट
विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आणि प्रवेश प्रक्रियेवर भाष्य करत नीटच्या निर्णयामुळे बरेच ‘नीट’ झाले आहेत, असे सांगत त्यांनी राज्यातील शिक्षणसम्राटांवरही निशाणा साधला़