सेना-भाजपाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन
By Admin | Updated: February 18, 2017 04:27 IST2017-02-18T04:27:34+5:302017-02-18T04:27:34+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न असेल़, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले

सेना-भाजपाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन
नवी मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न असेल़, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी वाशी येथील पत्रकार परिषदेत शुक्रवारी सांगितले़ राज्यात सरकार पडावे यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न होत आहेत. त्यामुळे शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडू नये, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.
शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडणे हे जनतेच्या हिताचे नाही़ कोणत्याच आमदाराला मध्यावधी निवडणुका नकोत़ मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात चांगले संबंध आहेत़ त्यांच्यात निवडणुकीमुळे बिनसले आहे. विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीनंतरही ते मुंबईत सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील़ मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत असल्याने विजय निश्चित असून उपमहापौर आरपीआयचा असणार आहे़, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़
राज्य सरकारमधून शिवसेनेने बाहेर न पडता, आरोप-प्रत्यारोपाऐवजी विकासावर भर द्यावा. मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एसआरए योजना राबवणे गरजेचे आहे़ मात्र पात्र-अपात्रतेची नियमावली ठरवण्याच्या वादामुळे त्यास विलंब होत आहे, असे आठवले यांनी सांगितले़
नोटाबंदीचा निर्णय घाईत झाला असला, तरी तो योग्यच आहे़ त्यामुळे गैरमार्गाने काहींच्या खिशात जाणारा पैसा शासनाच्या तिजोरीत जमा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचे ८० टक्के जनतेने स्वागत केले़ काँग्रेसकडून जाणीवपूर्वक राज्यसभेत गोंधळ घातला जात आहे़ त्यांनी पराभव मान्य करून सरकारला चांगल्या कामात साथ द्यावी़, असा सल्ला आठवले यांनी दिला़
भाजपावर जातीयवादाचे आरोप करून ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेसच्या ६० वर्षांच्या कार्यकाळातच सर्वाधिक जातीवाद झाला़, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
नोटाबंदीचे जनतेने केले स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे ८० टक्के जनतेने स्वागत केले. काँग्रेसकडून जाणीवपूर्वक राज्यसभेत गोंधळ घातला जात आहे. सरकार आरक्षणाच्या बाजूने असून केवळ ‘सबका साथ हिंदूंचा विकास’ असे नाही तर ‘सबका साथ सबका विकास’ हे भाजपाचे धोरण आहे. जातीनिहाय आरक्षण रद्द करायचे असल्यास अगोदर जाती संपवण्याची गरज आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.