इट का जवाब हम पत्थरसे देंगे !
By Admin | Updated: October 9, 2014 23:02 IST2014-10-09T22:36:26+5:302014-10-09T23:02:40+5:30
राजनाथ सिंग : साताऱ्यातील सभेत पाकला ठणकावले

इट का जवाब हम पत्थरसे देंगे !
सातारा : ‘भारत देवभूमी आहे. आमच्या देवभूमीवर कोणी वाईट नजर ठेवत असेल, तर आम्ही कदापि ते सहन करणार नाही आणि पडलीच तर आम्ही शांत बसणार नाही,’ असे सांगतच ‘पाकिस्तानने त्यांचे नापाक इरादे थांबविले नाही तर ‘इट का जवाब हम पत्थरसे देंगें’ असा खणखणीत इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज, गुरुवारी सातारा येथे पाकिस्तानला दिला.
‘सातारा-जावळी’चे भाजपचे उमेदवार दीपक पवार यांच्या प्रचारार्थ आज सातारा येथील गांधी मैदानावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची सभा झाली, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. मात्र, याचवेळी महाराष्ट्र फक्त अन्याय आणि अत्याचार तसेच घोटाळ्यांत नंबर वन असल्याचे सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीलाही लक्ष्य केले.
राजनाथ सिंग म्हणाले, ‘ज्यावेळी सीमेवर गोळीबार होत असताना त्याचे राजकारण होत आहे. मात्र, राजनीतीमध्ये असणारा ‘नीती’ शब्द विरोधकांनी विसरू नये. देश संरक्षणार्थ ‘अनीती’ नको तर ‘नीती’ हवी आहे. भारताला यापुढे कोणासमोर मान झुकवावी लागणार नाही, असे काम आम्ही करत आहे. पाकने गोळीबार सुरू केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले जात आहे. मात्र, आम्ही विरोधकांना सांगू इच्छितो की, देशाची हवा आता बदलली आहे. पाकविरोधात रणनीती आखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वेळोवेळी सूचना आणि आदेश देत आहेत. आपले सीमा सुरक्षा दल पाकचा सामना करण्यास सक्षम आहे. पाकने यापुढे खुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना र्इंट का जवाब पत्थर से देण्यास तयार आहे.’
राजनाथ सिंह यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवरही जोरदार आगपाखड केली. ते म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राचे वाटोळे केले. हे फक्त महाराष्ट्र नंबर वनचा दावा करतात. मात्र, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, घोटाळे, महिला अत्याचार यामध्ये नंबर वन आहेत.
राज्यात १३६२ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्र नंबर वन कसा, याचे उत्तर द्यावे लागणार आहे.’ राजनाथ सिंह म्हणाले, ‘मुंबई ही महाराष्ट्राचीच नव्हेतर जगाची आर्थिक राजधानी आहे. तिचा आपल्याला खेळ करायचा नाही.
महाराष्ट्रातील राजकीय मंडळी कोणताही आरोप झाला की कोणीही खुर्ची सोडायला तयार नाही. आम्हाला हे बदलायचे आहे. त्यामुळे भाजपला साथ करा.’
मराठीतून सुरुवात...
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सभामंचकावर आल्या-आल्या सर्वांना हात उंचावून अभिवादन केले आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये प्रथमच येत आहे. मी धन्य झालो. मला मराठी बोलता येत नाही; मात्र थोडा बहुत मराठी समज लेता हूँ’ अशी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
आता ‘मेड इन इंडिया’
राजनाथ सिंग यांनी आपल्या दहा मिनिटांच्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करीत असतानाच मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचे कौतुकही केली. ते म्हणाले, ‘विज्ञान तंत्रज्ञानात भारत आघाडी घेत असल्यामुळे उद्योगक्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. आता यापुढील काळात भारतात चायना मेड, अमेरिका मेड, जपान मेड उत्पादने मिळणार नाहीत, तर ती ‘मेड इन इंडिया’ उत्पादनेच मिळणार आहेत.