आम्ही सारे होणार कुलगुरू!

By Admin | Updated: October 28, 2014 00:29 IST2014-10-28T00:29:37+5:302014-10-28T00:29:37+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्णवेळ कुलगुरूपद निवडीच्या प्रक्रियेला सोमवारपासून खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. व्यवस्थापन अन् विद्वत् परिषदेच्या संयुक्त सभेदरम्यान कुलगुरूपदाच्या

We will all be the Vice Chancellor! | आम्ही सारे होणार कुलगुरू!

आम्ही सारे होणार कुलगुरू!

निवड समितीवर प्रफुल्लकुमार काळे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पूर्णवेळ कुलगुरूपद निवडीच्या प्रक्रियेला सोमवारपासून खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. व्यवस्थापन अन् विद्वत् परिषदेच्या संयुक्त सभेदरम्यान कुलगुरूपदाच्या निवड समितीवर वर्धा येथील राष्ट्रीय ग्रामीण औद्योगिक संस्थेचे संचालक डॉ. प्रफुल्लकुमार काळे यांचे नाव एकमताने नामनिर्देशित करण्यात आले. मात्र सभा रंगली ती सभेचे अध्यक्ष व सचिवपद कोण भूषविणार, या मुद्याने. प्रभारी कुलगुरू तसेच कुलसचिवांसह पाच सदस्यांनी या सभेत सहभागी होण्यास नकार दिला. अखेर डॉ. बबन तायवाडे यांनी अध्यक्षपद तर प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रशांत मोहिते यांनी सभेचे सचिवपद भूषविले. सभेत सहभागी न झालेले सर्वच पाचही सदस्य कुलगुरूपदाचे दावेदार असू शकतात. त्यामुळेच त्यांनी निवड प्रक्रियेचा भाग होण्यास नकार दिला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या सभेत विद्यापीठाच्या राजकारणातील बदलते रंगदेखील पाहायला मिळाले.
२५० महाविद्यालयांच्या प्रवेशबंदीच्या मुद्यावरून डॉ. विलास सपकाळ यांनी राजीनामा दिला. त्यानंतर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला होता. शंभरावा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर ही जबाबदारी डॉ. विनायक देशपांडे यांना देण्यात आली. परंतु पूर्णवेळ कुलगुरूपदासाठी प्रक्रिया सुरू करण्यास विलंब का होत आहे, यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. कुलगुरू निवड प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणून विद्यापीठातील विद्वत् परिषद आणि व्यवस्थापन परिषदेची संयुक्त सभा सोमवारी बोलावण्यात आली होती.
ही सभा सुरू होताच प्रभारी कुलगुरू व सभेचे अध्यक्ष डॉ. विनायक देशपांडे यांनी या प्रक्रियेत सहभागी होण्यास नकार दिला. औषधीविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद येवले तसेच डॉ. अंजन नायडू यांनीदेखील सभेपासून दूर राहण्याचा निर्णय सदस्यांना कळविला. यानंतर धक्का दिला तो कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे यांनी. ते देखील या बैठकीत सहभागी झाले नाही. या सभेला व्यक्तिगत कारणांमुळे उपस्थित राहू शकणार नाही, असे विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.के.सी.देशमुख यांनी अगोदरच प्रशासनाला लेखी कळविले होते.
सभेदरम्यान अचानक झालेल्या या घडामोडींमुळे सदस्यदेखील आश्चर्यचकित झाले. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची शिक्षण वर्तुळात ‘क्रेझ’ असून, हे पाचही सदस्य कुलगुरूपदाचे दावेदार असू शकतात, अशी कुजबूज सदस्यांमध्ये सुरू झाली. परंतु कुलगुरू, कुलसचिव यांच्या अनुपस्थितीत नेमके अध्यक्ष व सचिवपद कोण भूषविणार, यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला. अखेर डॉ. तायवाडे यांच्याकडे अध्यक्षपद तर प्रशांत मोहिते यांच्याकडे सचिवपद सोपविण्यात आले व सभेला सुरुवात झाली. वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. भरत मेघे यांनी डॉ. प्रफुल्लकुमार काळे यांचे नाव प्रस्तावित केले. विशेष म्हणजे डॉ. काळे यांच्या नावाला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी.के. अग्रवाल यांनी अनुमोदित केले. याला सर्व सभागृहाने एकमताने संमती दिली.
कोण आहेत प्रफुल्लकुमार काळे
वर्धा येथील राष्ट्रीय ग्रामीण औद्योगिक संस्थेचे संचालक डॉ. प्रफुल्लकुमार काळे यांच्याकडे शिक्षणक्षेत्रात कामाचा ३० वर्षांहून अधिकचा प्रदीर्घ अनुभव आहे. कृषी अभियांत्रिकीमध्ये ‘एमटेक’ असलेल्या डॉ. काळे यांनी आयआयटी खडकपूर येथून ‘फार्म स्ट्रक्चर’ या विषयात पीएचडी प्राप्त केली. सहयोगी प्राध्यापक, विभागप्रमुख अशी जबाबदारी सांभाळण्याचा अनुभव असणाऱ्या काळे यांच्याकडे सुमारे सव्वातीन वर्षे वनामतीच्या अतिरिक्त संचालकपदाची जबाबदारी होती. ७ आॅगस्ट २०१२ पासून त्यांच्याकडे राष्ट्रीय ग्रामीण औद्योगिक संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी आहे. त्यांचा एकूण अनुभव ३५ वर्षे ६ महिने इतका असून, त्यांची कार्यशैली पाहता त्यांचे नाव कुलगुरूपदाच्या निवड समितीवर एकमताने नामनिर्देशित करण्यात आले.

Web Title: We will all be the Vice Chancellor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.