आम्ही रोज गांधी जगतो

By Admin | Updated: February 1, 2015 00:56 IST2015-02-01T00:56:40+5:302015-02-01T00:56:40+5:30

राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी कुठलीही चढाओढ नाही किंवा बडेजावपणा नाही. विचारांसोबतच आचार अमलात आणले पाहिजे या भावनेतूनच उतरणारी कृती.

We live every day everyday | आम्ही रोज गांधी जगतो

आम्ही रोज गांधी जगतो

कृतीत दिसतो विचारांचा प्रभाव : गांधी विचारधारा विभागातील विद्यार्थ्यांच्या भावना
नागपूर : राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी कुठलीही चढाओढ नाही किंवा बडेजावपणा नाही. विचारांसोबतच आचार अमलात आणले पाहिजे या भावनेतूनच उतरणारी कृती. कुणाची सर्वधर्मसमभाव प्रार्थनेसोबत अध्ययनाची जोड तर काहींचा स्वच्छतेवर अन् सूतकताईवर भर. शिवाय सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, संयम अन् समाजसेवा या मूल्यांतून उमटलेली संवेदना. हीच होती त्यांची श्रद्धांजली अन् हाच होता महात्मा गांधींच्या प्रति नमनभाव.
महात्मा गांधी यांची जयंती व पुण्यतिथी यादिवशी त्यांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्याला माल्यार्पण करण्याची स्पर्धा दिसून येते. वर्षातील इतर दिवस मात्र अनेकांना गांधीविचारांचा सोयीस्कररीत्या विसर पडतो. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील गांधी विचारधारा विभागातील विद्यार्थी केवळ १ किंवा २ दिवस नव्हे तर दररोज गांधींच्या विचारांवर जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाला सत्य व अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या विचारांनी या विद्यार्थ्यांना येथे अक्षरश: खेचून आणले आहे व त्यांच्याबाबत सखोल अध्ययन करत असताना राष्ट्रपित्याच्या अधिकाधिक जवळ जात आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विभागातील काही विद्यार्थ्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्यांनी आत्मसात केलेले गांधीविचार कृतीत कसे उतरतात हे दिसून आले. गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी गाजावाजा न करता अतिशय साधेपणाने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
तरुणाईपर्यंत पोहोचावेत गांधींचे संस्कार
या विभागात बहुतांश विद्यार्थी हे ३५ वयाच्या वरचे आहेत. हा अभ्यासक्रम नोकरी नव्हे तर मूल्यांची शिकवण देणारा आहे. विद्यार्थ्यांचा भर करियर बनविण्यावर असतो. परंतु करिअर घडवत असताना गांधींच्या विचारांवर चालण्याचा त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्यापर्यंत गांधींचे संस्कार पोहोचावेत ही काळाची गरज आहे. यासाठी मूल्यशिक्षणात जास्तीत जास्त प्रमाणात गांधींचे विचार उमटले पाहिजे यावर भर दिला गेला पाहिजे असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. शिवाय २ आॅक्टोबर हा गांधीजयंतीचा दिवस ‘नॅशनल हॉलिडे’ न ठेवता ‘नॅशनल डे’ असला पाहिजे. विद्यार्थ्यांना या दिवशी सुटी न देता गांधीविचारांचे संचित दिले पाहिजे, अशा भावनादेखील त्यांनी व्यक्त केल्या.
शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविते गांधी
इतर कुठल्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला नाही किंवा चांगली नोकरी लागेल या कारणांमुळे इतर विभागात प्रवेश घेतले जातात. परंतु मला व माझ्या सहकाऱ्यांना गांधींच्या विचारांनी येथे खेचून आणले आहे. गांधी यांच्या विचारांचे अध्ययन करत असताना ते समाजापर्यंत व विशेषत: नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याचादेखील माझा प्रयत्न असतो. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांना ‘साधे जीवन,उच्च विचार’ या संस्कारांवर मार्गदर्शन केले.
-रजनी जसपाल काळे
मिळतेय संयमाची शक्ती
महात्मा गांधी यांच्या विचारांत नेमके असे काय आहे की संपूर्ण जग त्यांना मानवंदना करते हे जाणून घेण्याची इच्छा होती. विभागात गांधी समजून घेत असताना संयमाचे महत्त्व लक्षात आले. माझी सहनशीलता व संयम नक्कीच वाढले आहे. पुण्यतिथीच्या दिवशी कामाच्या ठिकाणी वादाचा प्रसंग निर्माण झाला. परंतु गांधीविचारांतून मिळालेल्या संयमातून समोरच्या व्यक्तीची मानसिकता समजून घेतली.
-सरिता देवल

Web Title: We live every day everyday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.