हमें अभी पढना है...
By Admin | Updated: July 2, 2016 04:41 IST2016-07-02T04:41:30+5:302016-07-02T04:41:30+5:30
अल्पवयीन असतानाही पालकांनी लग्न ठरवले. पण मनात शिक्षणाची ओढ.
_ns.jpg)
हमें अभी पढना है...
मनीषा म्हात्रे,
मुंबई- अल्पवयीन असतानाही पालकांनी लग्न ठरवले. पण मनात शिक्षणाची ओढ. अशा कठीण परिस्थितीत ‘हमे अभी पढना है...’ असे म्हणत लग्न ठरलेल्या मोठ्या बहिणीसह धाकट्या दोघींनीही घर सोडल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली. तिघीही अल्पवयीन आहेत. त्यांचा अद्याप शोध लागला नसून याप्रकरणी मानखुर्द पोलीस अधिक तपास करत आहेत.
मानखुर्द परिसरात मीना (१७), सलमा (१६) आणि रेश्मा (१५) (नावे बदललेली आहेत) या तिघी बहिणी कुटुंबियांसोबत राहतात. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी मोठी बहीण असलेल्या मीनाची लगीन घाई घरात सुरू झाली. मात्र आपल्याला अजून शिकायचे असल्याचे सांगत तिने लग्नाला विरोध केला. लग्नायोग्य झाल्यानंतरच लग्न करण्याचा आपला निर्णय तिने सांगितले. मात्र कुटुंबीयांकडून तिच्यावर दडपण आणले जात होते. बळजबरी सुरू होती. त्यामुळे घरच्यांच्या दबावाला कंटाळून मीनाने घर सोडण्याचे ठरविले. ताईनंतर आपल्याही लग्नासाठी घाई केली जाईल या भीतीने इतर दोघींनीही मीनासह घर सोडण्याचा निर्णय घेतला. २६ जूनच्या मध्यरात्री घरातली मंडळी गाढ झोपेत असताना या तिघी आपले सामान घेऊन घर सोडून निघून गेल्या.
रमजान सुरूअसल्याने उपवासापूर्वीचे जेवण करण्यासाठी २७ जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचे कुटुंबिय उठले. मुलींच्या खोलीत गेले असता तिन्ही मुली खोलीत नसल्याचे आढळले. शिवाय कपाटातील काही कपडेही जागेवर नसल्याचे आईच्या लक्षात आले. कुटुंबियांनी मित्र मंडळी, नातेवाईकांकडे शोध सुरू केला. दुपारपर्यंत सगळीकडे त्यांचा शोध घेतल्यानंतर मुली घर सोडून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला. नंतर मुलीचे मनाविरुद्ध लग्न लावण्याचे ठरल्याने ती घरात भांडत होती, असे चौकशीत पोलिसांना समजले. त्यामुळे प्राथमिक तपासात मनाविरुद्ध लग्न जुळविल्याने या मुलींनी घर सोडल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मानखुर्द पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंग भोसले यांनी दिली.
>मानखुर्दमधील घटना
२७ जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास रोजा सुरू होण्यापूर्वीच्या जेवणासाठी कुटुंबीय उठले. त्यांना तिन्ही मुली खोलीत नसल्याचे आढळले. शिवाय कपाटातील काही कपडेही जागेवर नसल्याचे आईच्या लक्षात आले.