शिवसेनेचं आमचं जमलं, सदाभाऊ तुमचं काम संपलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:19 AM2019-03-25T01:19:03+5:302019-03-25T01:19:15+5:30

भाजपा-शिवसेना युतीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघ सेनेला सुटल्यामुळे शिवसेनेचं आमचं जमलं, सदाभाऊ तुमचं काम संपलं, असा अप्रत्यक्ष संदेश भाजपाने रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिल्याची स्थिती आहे.

 We have a lot of Shiv Sena, Sadubhau! | शिवसेनेचं आमचं जमलं, सदाभाऊ तुमचं काम संपलं!

शिवसेनेचं आमचं जमलं, सदाभाऊ तुमचं काम संपलं!

Next

मुंबई : भाजपा-शिवसेना युतीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघ सेनेला सुटल्यामुळे शिवसेनेचं आमचं जमलं, सदाभाऊ तुमचं काम संपलं, असा अप्रत्यक्ष संदेश भाजपाने रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिल्याची स्थिती आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी हे युतीतून बाहेर पडल्यानंतर सदाभाऊ खोत भाजपासोबतच राहिले. त्यांनी रयत क्रांती संघटना स्थापन केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊंना हातकणंगले मतदार संघातून बळ देण्याचे प्रयत्न केले. राज्यमंत्रीपदाच्या मर्यादा असतानाही सदाभाऊंनी या मतदार संघावर लक्ष केंद्रीत करून काही प्रमाणात विकास कामे सुरू केली. या मतदार संघात दोन वर्षांपासूनच निवडणुकीचे वातावरण तयार झाले होते. शेट्टी यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाला शह देण्यासाठी कोल्हापुरातील वारणा कोडोली येथे नोव्हेंबरमध्ये रयत क्रांती संघटनेची ऊस परिषदही झाली होती. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख व पश्चिम महाराष्ट्रातील भाजपाचे आमदारही उपस्थित होते. याच परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेट्टी यांच्याविरोधात खोत उमेदवार असतील, असे सूचित केले होते. सदाभाऊंनी मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले.
तेव्हापासून कोल्हापूरकरांना राजू शेट्टी विरुद्ध सदाभाऊ खोत यांच्यातील संभाव्य लढतीची प्रतीक्षा होती. दोघांंमध्ये सुरू असलेल्या सवाल-जबाबाचे पर्व निवडणुकीत आणखी रंगेल, असे सर्वांना वाटले होते. मात्र शेट्टी यांच्याविरोधात सदाभाऊंचा भाजपाने हत्यार म्हणून वापर केल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
गरज सरो वैद्य मरो याची प्रचिती सदाभाऊंच्या रुपाने पाहायला मिळाली, असे कार्यकर्ते बोलत आहेत.

हे सरकार शेतकरी, सामान्यांसाठी काम करत आहे. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी घेण्यास मी तयार आहे. माझे योगदान मुख्यमंत्र्यांच्या कामी आले, असे मी समजतो. - सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

Web Title:  We have a lot of Shiv Sena, Sadubhau!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.