सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या कांदिवली येथील ‘सावली बार’ला बुधवारी भेट देत कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली.गेले काही दिवस शिंदेसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने परवाना असलेल्या ‘सावली बार’बाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मंगळवारी उद्धवसेनेचे नेते आ. अनिल परब यांनी माहितीच्या आधारे कदम यांच्या बारवर किती वेळा पोलिस छापे पडले याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्या अनुषंगाने अंजली दमानिया यांनीही या बारला भेट दिली आणि जवळच्या काही दुकानदारांकडे त्याबाबत चौकशी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दमानिया यांनी कदम यांच्यासारखे डान्स बार चालवणारे गृह राज्यमंत्री महाराष्ट्राला नको, असे सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर दमानिया यांनी समता नगर पोलिस ठाण्याला भेट देऊन तेथे पोलिस अधिकाऱ्यांशीही याबाबत चर्चा केली.
‘डान्स बार चालवणारे गृह राज्यमंत्री नको’; अंजली दमानिया यांची मागणी; बारला दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 10:21 IST