सांगली - देवाभाऊंसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखे लढायला तयार आहे. माझा राजा जोपर्यंत गडावर जात नाही, तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही आणि जीव सोडणार नाही असं बाजीप्रभू देशपांडे म्हणाले होते. माझ्या भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट असतात. आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही देवेंद्र फडणवीसांसोबत ठामपणे आहे असं विधान गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात इतकी कामे झाली परंतु जे काम देवेंद्र फडणवीसांना जमले ते दुसऱ्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना जमले नाही. महाराष्ट्राला मिळालेला हा कोहिनूर हिरा आहे. जातीपलीकडे जाऊन हा माणूस जपला आहे. त्यांना टार्गेट करण्याचे काम केले जाते. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात जातीवाद निर्माण होतो तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले जाते असा आरोप त्यांनी केला.
तसेच भाजपा असा पक्ष ज्यात कार्यकर्ता मालक आहे. दुसरे पक्ष पाहा मुलायम सिंह- समाजवादी पार्टी, लालू प्रसाद यादव त्यांचा मुलगा वारस, बाळासाहेब ठाकरे त्यांचा मुलगा वारस, बारामतीकरांची पार्टी त्यांचे सगळे गणित माहिती आहे. हे ठरलेले आहे परंतु भाजपाचा उद्याचा अध्यक्ष कोण हे कुणीच सांगू शकत नाही. हा एकमेव कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे नेते उभे राहतात असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.
हिंदूविरोधी भूमिका घेतील त्यांना ठेचूनच काढणार
छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते नाव घेऊन चालत नाही तर त्या विचारावर चालावे लागते. रायगड किल्ल्याखालील छत्र निजामपूर गावाचे नाव १८ दिवसांत बदलण्याचं काम केले. १९८८ साली औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर म्हणणार असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ते नाव २०२२ मध्ये बदलण्यात आले. इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर केले तर काहींची झोप उडाली. जे हिंदूविरोधी भूमिका घेतील त्यांना ठेचूनच काढले जाईल ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे असा इशारा देत गोपीचंद पडळकरांनी विरोधकांना इशारा दिला.
"...तर दुष्काळ मिटला नसता"
आमच्या माण खटाव तालुक्याचा दुष्काळ देवाभाऊंनी हटवला. आम्ही शाळेत असताना नागनाथ नायकवडींची पाणी परिषद व्हायची. तासगाव, जत, खानापूर, कवठे महाकांळ, आटपाडी, कडेगाव, माण, खटाव, फलटण, कोरेगाव इतक्या सगळ्या तालुक्यातील लोक आटपाडीला येऊन पाणी परिषद व्हायची. कृष्णा नदीचे पाणी तुम्हाला द्यायचं आहे. आम्हाला प्रश्न पडायचा, आटपाडीतून भिवघाट चढल्यावर खानापूर येते. मग तिथून पुढे गेल्यानंतर आणखी एक डोंगर उतरला तेव्हा कृष्णा नदी येते. हे पाणी आम्हाला कसे मिळणार असा प्रश्न पडायचा. मात्र नागनाथ नायकवडींनी हे स्वप्न पाहिले आणि देवेंद्र फडणवीस यांनी ते सत्यात उतरवले. दुष्काळी तालुक्यातील लोक देवाभाऊंना धन्यवाद देतात. जर २०१४ साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते तर दुष्काळी तालुक्याचा दुष्काळ मिटू शकला नसता. आधी ५० कोटी, १५० कोटी खर्च करायचे. कंत्राटदार पैसे घ्यायचे. पंतप्रधान सिंचन योजनेतून ४९ हजार कोटी महाराष्ट्राला मिळाले आणि त्यातून देवेंद्र फडणवीसांनी दुष्काळ संपवण्याचं काम केले असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.