आम्ही थापा मारणारे राजकारणी नाही

By Admin | Updated: July 7, 2016 08:24 IST2016-07-07T01:19:08+5:302016-07-07T08:24:50+5:30

राजकारणातील लोक कशा थापा मारतात, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र, आम्ही थापा मारणारे राजकारणी नाही, असा टोला शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा नामोल्लेख न करता

We are not thumping politicians | आम्ही थापा मारणारे राजकारणी नाही

आम्ही थापा मारणारे राजकारणी नाही

ठाणे : राजकारणातील लोक कशा थापा मारतात, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र, आम्ही थापा मारणारे राजकारणी नाही, असा टोला शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा नामोल्लेख न करता लगावला. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचा समावेश न झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी ही टीका केली.
कच्छ अस्मिता मंचतर्फे कच्छ पगडी कोणाशिरे, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उद्धव ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की, आम्ही चांगल्याला चांगले म्हणतो. आम्हाला जे पटत नाही, त्याला विरोध करतो. आमचा कारभार रोखठोक आहे. शिवसेना आणि ठाणे यांचे नाते अतूट आहे. गुजराती कच्छ समाजातील व्यावसायिक ठाण्यात मोठ्या संख्येने आहेत. त्याचे संरक्षण करणे, हे शिवसेना आपले कर्तव्य मानते. ज्याप्रमाणे दुधात साखर विरघळते, त्याप्रमाणे कच्छी समाज महाराष्ट्राशी एकरूप झाला आहे. कच्छी समाजाने मला आपले समजून बोलावले, डोक्यावर पगडी घालून मान दिला, तो केवळ माझा एकट्याचा मानसन्मान नसून शिवसेनेचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कच्छी समाजाच्या कार्यक्रमाला ठाकरे यांनी आवर्जून हजेरी लावण्याला विशेष महत्त्व आहे. ठाण्यात गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असून येथील व्यापारीवर्गाला ‘संरक्षण’ देण्याची भाषा ठाकरे यांनी करणे, हा केवळ योगायोग नाही. वेगवेगळे समाज आपल्याकडे वळवण्याकरिता भविष्यात शिवसेना व भाजपाकडून प्रयत्न होणार, असे संकेत प्राप्त होत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: We are not thumping politicians