नागपूर : वर्तमानपत्रांच्या भरवशावर चालणारा आपला पक्ष नाही. आम्ही कागदी वाघ नाही आहोत. मात्र, काही कागदी वाघ आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणचेही नाव न घेता शिवसेनेच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. भाजपाची पूर्व विदर्भातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची आढावा बैठक कोराडी येथे पार पडली. यावेळी मुंख्यमंत्री बोलत होते. आपला पक्ष मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट असा आहे. वर्तमानपत्रांच्या भरवशावर चालणारा आपला पक्ष नाही. आम्ही कागदी वाघ नाही आहोत, मात्र, काही कागदी वाघ आहेत. काही नेते फक्त वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आणून स्वतःला मोठे नेते समजतात, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले. याचबरोबर, विरोधक कितीही एकवटले तरी ते भाजपाला हरवू शकत नाही. आज विरोधात असणारे तेव्हाही विरोधात होते. उद्या मुलायम सिंग यादवांनी येथे येवून प्रचार केला तरी आपल्याला काय फरक पडतो. त्यामुळे घाबरू नका. भाजपाचा विजयरथ रोखणे कठीण आहे. पुढील पंधरा वीस वर्षे भाजपाचीच सत्ता येणार, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. यावेळी बैठकीला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते, खा. डॉ. विकास महात्मे, भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्यासह बहुतांश आमदार उपस्थित होते.
आम्ही कागदी वाघ नाही; शिवसेनेच्या नेत्यांवर नाव न घेता मुख्यमंत्र्याचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 21:14 IST