‘आम्ही सारे पानसरे’
By Admin | Updated: March 3, 2015 00:33 IST2015-03-02T22:04:08+5:302015-03-03T00:33:11+5:30
पानसरेंच्या मारेकऱ्यांना फाशी द्या : कोल्हापुरात विद्यार्थ्यांची मोर्चाने मागणी

‘आम्ही सारे पानसरे’
कोल्हापूर : ‘कॉमे्रड पानसरे अमर रहे’, ‘मारेकऱ्यांना त्वरित पकडा व फाशी द्या’ आदी मागण्यांकरिता कोल्हापुरातील तीन हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सोमवारी शहराच्या मुख्य मार्गावरून मोर्चा काढला. या मोर्चात कोल्हापुरातील बहुतांश शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. मोर्चात ‘आम्ही सारे पानसरे’ या लालटोप्या घातलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाची सुरुवात महाराष्ट्र हायस्कूल येथे ‘आम्ही फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा चालवू’ अशी प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली. त्यानंतर मोर्चास सुरुवात करण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांच्या हाती ‘शाहूंच्या भूमीत भ्याड हल्ल्याचा निषेध’, ‘हिंदू-मुस्लिम-शीख, इसाई हम सब भाई-भाई’, ‘धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजवाद झिंदाबाद’, ‘लढेंगे जितेंगे’, ‘आगे और लढाई हैं’, ‘अब लढाई आरपार’, ‘जो हिटलर की चाल चलेगा, वो हिटलरकी मौत मरेगा’ या फलकांनी व ‘आम्ही सारे पानसरे’ या लाल टोप्या परिधान केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मोर्चात सहभागी विद्यार्थ्यांच्या ‘मारेकऱ्यांना त्वरित पकडून फाशी द्या व कॉमे्रड पानसरे अमर रहें’ या घोषणांनी मोर्चा मार्ग दणाणून सोडला. (प्रतिनिधी)
२0 शाळांचा सहभाग
कोल्हापूर शहरांतील २० प्रमुख शाळांमधील ८ वी व ९ वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
मारेकऱ्यांना त्वरित पकडा अन्यथा लढा तीव्र करू
गेली चौदा दिवस केवळ तपासच सुरू आहे. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अद्यापही पकडलेले नाही. त्यांना शोधून तत्काळ फाशी द्या, अन्यथा याहीपेक्षा तीव्र पद्धतीने आंदोलन करू .
- डी. बी. पाटील, शिक्षणतज्ज्ञ