पुढच्या आठवड्यात पाणीकपात रद्द होणार?
By Admin | Updated: July 13, 2016 20:06 IST2016-07-13T20:06:16+5:302016-07-13T20:06:16+5:30
गेले वर्षभर पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी अखेर खूशखबर आहे

पुढच्या आठवड्यात पाणीकपात रद्द होणार?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - गेले वर्षभर पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी अखेर खूशखबर आहे. मुसळधार पावसामुळे तलावांतील पाण्याची पातळी दररोज वाढत आहे़ गतवर्षीच्या तुलनेही तलावांमध्ये दुप्पट जलसाठा आहे़ त्यामुळे प्रशासन पुढच्या आठवड्यात पाणीकपात मागे घेण्याचे संकेत आहेत़ अपुऱ्या पावसामुळे आॅगस्ट २०१५ पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात आहे़ यावर्षी जून महिना कोरडा गेल्यामुळे पाण्याचे टेन्शन वाढले होते़ मात्र जुलै महिन्यात मुसळधार पावसाने मुंबईवर कृपादृष्टी दाखविली आहे़ त्यामुळे जुलै महिन्यातील पंधरवडा पूर्ण होण्याआधीच तलावांमध्ये तब्बल पाच लाख दशलक्ष लीटरहून अधिक जलसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे़ तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने काही तलावं लवकरच भरुन वाहण्याची चिन्हे आहेत़ त्यामुळे पाणीकपात मागे घेण्याची मागणी जोर धरु लागली आहे़ भाजपाचे दिलीप पटेल यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली़ त्यानुसार तलावांमधील पाण्याच्या पातळीचा आढावा घेऊन स्थायी समितीच्या पुढच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी दिले.
जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये
तलाव- कमाल किमान आजची स्थिती आजचा पाऊस(मि़मी़)
मोडक सागर १६३़१५ १४३़२६ १५४़९९ ७२़६०
तानसा १२८़६३ ११८़८७ १२४़८५ २३़८०
विहार ८०़१२ ७३़९२ ७७़२५ २७़२०
तुळशी १३९़१७ १३१़०७ १३८़८९ १४़००
अप्पर वैतरणा ६०३़५१५९५़४४ ५९८़१८ १०८
भातसा १४२़०७ १०४़९० १२५़२७ २३
मध्य वैतरणा २८५़०० २२०़०० २६४़७० ७४़९०
एकूण २०१६ -६३९६९८ दशलक्ष लीटर २०१५- २९०३९६ दशलक्ष लीटर
* मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़
* गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून पाणीकपात सुरु असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़
* मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़