मेळघाटात पाणवठे आटताहेत!
By Admin | Updated: January 31, 2015 05:11 IST2015-01-31T05:11:11+5:302015-01-31T05:11:11+5:30
यंदा दुष्काळ, अत्यल्प पावसाचा सर्वाधिक फटका वन्यप्राण्यांना बसण्याचर चिन्हे आहेत़ उन्हाळा सुरू होण्यास अवधी असला तरी मेळघाट

मेळघाटात पाणवठे आटताहेत!
अमरावती : यंदा दुष्काळ, अत्यल्प पावसाचा सर्वाधिक फटका वन्यप्राण्यांना बसण्याचर चिन्हे आहेत़ उन्हाळा सुरू होण्यास अवधी असला तरी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाणवठे आटू लागले आहेत. परिणामी एप्रिल, मे महिन्यात काय स्थिती राहील, याचा अंदाज घेत वनअधिकाऱ्यांनी आतापासून नियोजन आखायला सुरुवात केली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा परिसर दऱ्याखोऱ्यात विभागला आहे. वाघांच्या संरक्षणासाठी अन्य वन्यप्राण्यांचे संगोपन करताना त्यांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वनाधिकारी नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती करतात. मात्र, कृत्रिम पाणवठ्याची स्थिती दयनीय झाली असून, सुधारण्याची तयारी केली जात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जमीन खडकाळ, वाहते पाणी असलेली आहे. त्यामुळे पाणवठ्यात पाणी कायम राहील, याची शाश्वती नसल्याचे वनअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मेळघाटात ६००पेक्षा अधिक नैसर्गिक पाणवठे आहेत. त्यापैकी सुमारे १०० पाणवठे कोरडे पडत आहेत़ उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.
मेळघाटात सागवान वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सागवान वृक्ष जमिनीत ओलावा टिकवून ठेवत नाहीत. त्या तुलनेत ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मिश्र रोपवन असल्याने येथे पाण्याची समस्या अधिक प्रमाणात उद्भवत नसल्याचे चित्र आहे. परंतु संभाव्य स्थिती लक्षात घेता व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे़ वाहत्या झऱ्यांतून पाणी साठवणीच्या उपाययोजना करीत असताना मेळघाटातील पाच नद्यांवर सिंचन क्षमता वाढविणाऱ्यावरही भर दिला जात आहे. गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविताना दमछाक होत असली तरी उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाणीटंचाई भासू नये, यासाठी कृती आराखडा तयार केला जात आहे. (प्रतिनिधी)