शून्य अपघाताच्या लक्ष्यावर पाणी!
By Admin | Updated: September 7, 2015 02:42 IST2015-09-07T02:42:23+5:302015-09-07T02:42:23+5:30
दहीहंडी उत्सव यंदा निर्बंधांमुळे चांगलाच वादात अडकला होता. हा वाद कमी करण्यासाठी आयोजक आणि मंडळांनी अपघात होऊ द्यायचे नाही, असे लक्ष्य ठेवले होते. पण, उत्सवादरम्यान मात्र यावर पाणी फिरले.

शून्य अपघाताच्या लक्ष्यावर पाणी!
मुंबई : दहीहंडी उत्सव यंदा निर्बंधांमुळे चांगलाच वादात अडकला होता. हा वाद कमी करण्यासाठी आयोजक आणि मंडळांनी अपघात होऊ द्यायचे नाही, असे लक्ष्य ठेवले होते. पण, उत्सवादरम्यान मात्र यावर पाणी फिरले. दहीहंडी उत्सवात सायंकाळपर्यंत शहर आणि उपनगरात तब्बल १८८ गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी १९ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला.
उंच थरांमुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठी उत्सवाला थरांची मर्यादा घालण्यात आली होती. पण, या नियमांची पायमल्ली करून शहरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला. दहीहंडीचे थर लावताना, थर उतरवताना, बाजूला उभे असताना थर कोसळल्याने, थरावर चढताना अनेक गोविंदा किरकोळ जखमी झाले. त्यातील जवळपास १९ गोविंदा गंभीर जखमी झाले. काहींना डोक्याला मार लागला असून, काहींचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत. पण, सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर आहे. तर, १६९ गोविंदांना आपत्कालीन विभागात प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आले.
16उपनगरीय रुग्णालयांत ७७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यापैकी
८ गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिद्धार्थ रुग्णालयात दाखल केलेल्या एका गोविंदाच्या डोक्याला मार बसला आहे. उर्वरित सात गोविंदांना फ्रॅक्चर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चोख बंदोबस्त
रात्री श्रीकृष्ण जन्मावेळी प्रत्येक दहीहंडी पथकाच्या स्थानिक हंडीस्थळी पोलीस नजर ठेवून होते; तर रविवारी सकाळपासून शहरात सर्वच ठिकाणी दहीहंडीचे आयोजन केलेल्या जागी पोलिसांचा फौजफाटा दिसून आला.
दहीहंडीदरम्यान वाहतूक नियम मोडणाऱ्या बाईकस्वारांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला होता. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात तब्बल ८२0 केसेस दाखल करण्यात आल्याचे सह पोलीस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारांबे यांनी सांगितले.
संध्याकाळी ४ ते संध्याकाळी ६पर्यंत सर्वाधिक कारवाई झाली असून, तब्बल २0५ केसेस झाल्याचे भारांबे म्हणाले. तर संध्याकाळी ६ ते संध्याकाळी ७ या वेळेत १७८ केसेस ट्रिपल सीटच्या दाखल झाल्या आहेत.
ट्रकवर लटकून प्रवास करणाऱ्या ६0 केसेसही दाखल करण्यात आल्या असून, या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र या केसेस करण्यात येत असल्या तरी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात होते.
नायर रुग्णालय
११ गोविंदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. १७ वर्षाच्या गोविंदाचे उजव्या हाताचे कोपर फॅ्रक्चर झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
केईएम रुग्णालय
केईएम रुग्णालयात सायंकाळपर्यंत ५८ गोविंदा उपचारासाठी दाखल झाले होते. यापैकी ६ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५ जणांना आॅर्थाेपेडिक्स विभागात तर एकाला सर्जरी विभागात दाखल करण्यात आले आहे.
सायन रुग्णालय
सायन रुग्णालयात एकूण
१६ गोविंदा दाखल झाले होते. त्यापैकी ६ गोविंदांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. तर १० गोविंदांच्या तपासण्या सुरू होत्या. त्यापैकी बहुतांश जणांना डिस्चार्ज देण्यात येईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात
आले.
जे.जे. रुग्णालय समूह
जे.जे. रुग्णालयात ६, जी.टी. रुग्णालयात ६ आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात ८ जखमी गोविंदा उपचारासाठी आले होते. प्राथमिक उपचार देऊन सर्वांना सोडून देण्यात आले.