गावकऱ्यांना पाणी पुरवा अन्यथा दिघी बंदर बंद करा - हायकोर्ट
By Admin | Updated: April 8, 2017 05:11 IST2017-04-08T05:11:07+5:302017-04-08T05:11:07+5:30
दिघी बंदर व्यवस्थापनाने बंदराचे वाढीव बांधकाम करताना, आजूबाजूच्या चार गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले

गावकऱ्यांना पाणी पुरवा अन्यथा दिघी बंदर बंद करा - हायकोर्ट
मुंबई : दिघी बंदर व्यवस्थापनाने बंदराचे वाढीव बांधकाम करताना, आजूबाजूच्या चार गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले होते. ५ वर्षे उलटूनही या आश्वासनांची पूर्तता करण्यात न आल्याने, उच्च न्यायालयाने दिघी बंदर व्यवस्थापनाला आज चांगलेच खडसावले. गावकऱ्यांना दररोज १०० टँकरने पाणी पुरवा अन्यथा बंदर बंद करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिघी बंदर व्यवस्थापनाला शुक्रवारी दिले.
२०११ मध्ये दिघी बंदराचे वाढीव बांधकाम करताना, व्यवस्थापनाने दिघी, नानवली, सावर्डेकर, मणेरी आदी गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार, काही दिवस दिघी बंदर व्यवस्थापनाने गावकऱ्यांना सुविधा उपलब्ध करूनही दिल्या. मात्र, दिघीजवळ असलेल्या कुडकी गावाने पाणी देण्यास नकार दिल्याची सबब पुढे करत, व्यवस्थापनाने संबंधित गावांना टँकरने पाणी पुरवण्यास नकार दिला. याविरुद्ध दिघीच्या काही रहिवाशांनी अॅड. आर. मेंदाडकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
बंदर व्यवस्थापनाच्या वकिलांनी पाणीच उपलब्ध नसल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. पाणी उपलब्ध नसतानाही काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांना टँकरने पाणी पुरवण्याचे काम सुरू आहे.
मात्र, १०० टँकरने पाणी पुरवणे शक्य नसल्याचे व्यवस्थापनाच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले, पण उच्च न्यायालयाने व्यवस्थापनाचे म्हणणे मान्य करण्यास नकार दिला. ‘गावकऱ्यांना तातडीने पाणी पुरवा अन्यथा बंदराचे कामकाज बंद करा,’ असे निर्देश उच्च न्यायालयाने व्यवस्थापना दिले. (प्रतिनिधी)