टँकरने पाणीपुरवठा बंद

By Admin | Updated: June 29, 2016 02:27 IST2016-06-29T02:27:52+5:302016-06-29T02:27:52+5:30

जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने ४९ पैकी ४३ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे बंद करण्यात आले

Water supply to tankers stopped | टँकरने पाणीपुरवठा बंद

टँकरने पाणीपुरवठा बंद

आविष्कार देसाई,

जिल्ह्यामध्ये समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने ४९ पैकी ४३ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे बंद करण्यात आले आहे. पेण तालुक्यात सहा ठिकाणी अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तोही लवकरच बंद करण्यात येणार आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. विंधण विहिरींसाठी सुमारे ५० लाख खर्च करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी अपेक्षापेक्षा कमी पाऊस झाला होता. त्यामुळे मध्यम, तसेच लघु धरणांमध्ये पाणीसाठ्याचे प्रमाण कमी होते. उन्हाळा कडक असल्याने फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाण्याचे संकट जिल्ह्यातील काही भागांमध्ये ओढवले होते. पाण्याची टंचाई जाणवत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागायची. लहान मुले, महिलांसह वयोवृध्दही पाण्यासाठी भटकंती करीत असल्याचे चित्र पहायला मिळाले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुमारे सात कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार केला होता. त्यामध्ये २९२ गावे आणि एक हजार ९२६ वाड्या टंचाईग्रस्त म्हणून घोषित केल्या होत्या. त्या माध्यमातून टंचाईच्या ठिकाणी पिण्याचे पाणी टँकर, बैलगाडीने पोचविण्याचे नियोजन करण्यात आले होते.
उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने पाण्याच्या टंचाईने चांगलेच डोके वर काढले होते. जून महिना संपत आला, तरी काही पेण, महाड आणि रोहे तालुक्यांमध्ये अद्यापही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाने समाधानकारक बरसण्यास सुरुवात केल्याने अलिबाग, मुरुड आणि सुधागड-पाली तालुक्यातील प्रत्येकी एक टँकर बंद करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील आठ, कर्जत ५, पोलादपूरमध्ये ६ टँकरने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पेण तालुक्यामध्ये एकूण १२ टँकर सुरु होते. पैकी सहा टँकर बंद केले आहेत. उरण, पनवेल, खालापूर, तळा, श्रीवर्धन, माणगाव तालुक्यातीलही प्रत्येकी दोन असे एकूण ४३ टँकर बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यावर सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पावसाची मेहरबानी आणखी झाल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून आसपासच्या पाण्याच्या स्रोतांमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत मिळणार आहे.
>पावसामुळे नदी, नाले भरले
रायगड जिल्ह्यात पावसाचे दमदार बरसणे सुरूच आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये सरासरी ६२.०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. म्हसळा तालुक्यात सर्वाधिक १४३ मि.मी. पाऊस पडला आहे. सर्वात कमी १२. ४० मि.मी. पावसाची नोंद कर्जत तालुक्यात झाली आहे. सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे नदी, नाले, धरणांमध्ये पाणी भरले जात आहे. सखल भागात पाणी साठल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.बहुतांश टँकरने पाणीपुरवठा बंद झाला आहे. फक्त पेण तालुक्यात सहा टँकर सुरु आहेत. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. विंधण विहिरींसाठी सुमारे ५० लाख खर्च झाला आहे. टंचाई आराखड्यात याच दोन महत्त्वाच्या बाबींवर खर्च करण्यात येतो.
- अरविंद टोरो, कार्यकारी अभियंता

Web Title: Water supply to tankers stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.