पाणीपुरवठा मंत्री लोणीकर गोंधळले
By Admin | Updated: December 17, 2014 06:17 IST2014-12-17T06:17:55+5:302014-12-17T06:17:55+5:30
उल्हास नदीवरील पाणी नियोजनात करण्यात आलेल्या कपातीच्या प्रश्नावर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर चांगलेच गोंधळले.

पाणीपुरवठा मंत्री लोणीकर गोंधळले
नागपूर : उल्हास नदीवरील पाणी नियोजनात करण्यात आलेल्या कपातीच्या प्रश्नावर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर चांगलेच गोंधळले. मंत्र्यांना सुरुवातीपासूनच एकाही प्रश्नाचे उत्तर देणे जमले नाही. यामुळे सभागृहात सरकारवर नामुष्कीची वेळ आली. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची बाजू सावरली. या प्रश्नावर लोणीकर यांच्या खात्याशी संबंधित सर्व उत्तरे स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली.
प्रश्नोत्तराच्या तासात आ. रुपेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी पाणी नियोजनात दाखविण्यात आलेल्या १५ टक्के तुटीचा प्रश्न उपस्थित केला. ही कपात करू नये अशी मागणी करीत पाणीपुरवठ्यासाठी टँकरची संख्या वाढविणार का, असा प्रश्न त्यांनी केला. यावर उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची भंबेरी उडाली. काय बोलावे हे त्यांना सूचतच नव्हते. हे पाहून सभागृहातील सदस्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. यावर अध्यक्षांनी मंत्र्यांना सांभाळून घ्या, अशी सूचना सदस्यांना केली. मंत्री गोंधळल्यामुळे सरकारची होत असलेली नामुष्की पाहून परिस्थिती सावरण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उठले व कपात कालावधी मोठा असल्यामुळे मागणी एवढे टँकर देऊ, असे सांगितले. यानंतर अजित पवार यांनी वरच्या धरणात पाणी कपात करण्यात आल्यामुळे उल्हास नदीत पाणी कपात केली का, अशी विचारणा मंत्र्यांना केली. पवारांची ही गुगली लक्षात येताच पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस लागलीच मंत्र्यांच्या बचावासाठी उठले व उपलब्ध पाण्याचा अंदाज काढून कपात केली जाते, असे स्पष्ट केले. पुढील सर्व प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनीच दिली. मंदा म्हात्रे यांनी उल्हास नदीचे पाणी चोरून एका फार्महाऊसमध्ये वळविण्यात आल्याची तक्रार केली. (प्रतिनिधी)