साडेतीन हजार गावांत पाणीटंचाई
By Admin | Updated: June 1, 2015 04:36 IST2015-06-01T04:36:28+5:302015-06-01T04:36:28+5:30
विविध कारणांमुळे पाणीपुरवठा योजनांचे काम होऊ न शकल्याने राज्यातील जवळपास साडेतीन हजार गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली

साडेतीन हजार गावांत पाणीटंचाई
बुलडाणा : विविध कारणांमुळे पाणीपुरवठा योजनांचे काम होऊ न शकल्याने राज्यातील जवळपास साडेतीन हजार गावांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे़ यामध्ये १ हजार ८४६ गावे आणि १ हजार ८०२ वाड्यांचा समावेश आहे़ गत दोन वर्षांत पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबाजावणीत दिरंगाई झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे़
अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र योजना आहेत. शिवाय जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदींच्या नळपाणीपुरवठा योजना आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून गत दोन वर्षांमध्ये ९ हजार २६६ गाव-वाड्यांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र उद्दिष्टपूर्ती न झाल्यामुळे अनेक योजना पूर्णत्वाकडे जाऊ शकल्या नाहीत़ अनेक योजनांच्या जलवाहिन्यांना गंज चढला आहे, जलकुंभ कोरडे पडले आहेत़ तसेच काही योजनांना वीज बिलाच्या थकबाकीचा आणि गावातील परस्परांतील वादाचा फटका बसला आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च होऊनही योजना कार्यान्वित होऊ न शकल्याने या भागातील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून २०१३-१४ या वर्षात ५०६६ गाववाड्यांच्या उद्दिष्टापैकी ४ हजार ६५ गाववाड्यांची कामे पूर्ण करण्यात आली. तर २०१४-१५ मध्ये ४ हजार २०० गाववाड्यांच्या उद्दिष्टांपैकी केवळ १ हजार ५५३ गाववाड्यांतील योजनांची कामे पूर्णत्वाकडे जाऊ श्कलेली आहेत़ तर ३ हजार ६४८ ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना बंदावस्थेत आहेत. (प्रतिनिधी)