राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर पाणीप्रश्न

By Admin | Updated: April 4, 2017 03:29 IST2017-04-04T03:29:06+5:302017-04-04T03:29:06+5:30

पनवेल महानगरपालिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून, राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.

Water problems on the political parties' agenda | राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर पाणीप्रश्न

राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर पाणीप्रश्न

अरुणकुमार मेहत्रे,

कळंबोली- पनवेल महानगरपालिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून, राजकीय पक्षांकडून वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. शहरातील काही भागात अल्पदाबाने, दिवसभरातून एकदाच तासभरासाठी पाणी येत असल्याने नागरिक हैराण आहेत. त्यामुळे शेकाप आघाडीने हाच प्रश्न अजेंड्यावर ठेवला आहे. ‘दिवसाआड पाणी... किती दिवस तीच कहाणी...’ अशी बॅनरबाजी शेतकरी कामगार पक्षाने सुरू केली असून अशा आशयाचे बॅनर्स शहरात, रेल्वेस्थानकात लावले आहेत. मनसे आणि शिवसेनेकडूनही पाण्याचेच भांडवल करण्यात येत आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीचा विचार करता, शहराला देहरंग धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी असल्याने मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही. त्यामुळे एमजेपी आणि एमआयडीसीकडून पाणी विकत घ्यावे लागते. मे महिन्यापर्यंत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी काही भागात आतापासूनच पाणीकपात करण्यात आली आहे. त्यासाठी देहरंग धरणातून अतिशय कमी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे, तर इतर प्राधिकरणाकडून येणारे पाणी दिवसाआड पनवेलकरांना पुरवले जात आहे. यामुळे पाणीटंचाई भासत असून गतवर्षीही हीच स्थिती होती.
नवीन पनवेल, कळंबोली या वसाहतींना एमजेपीकडून मागणीप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. कामोठे नोडलाही नवी मुंबई महापालिकेकडून कमी पाणी दिले जाते. खारघरमधील परिस्थिती फारशी वेगळी नाही. समाविष्ट केलेल्या गावांचा प्रश्नच आणखीनच बिकट आहे. दरवर्षी भेडसावणाऱ्या पाणीसमस्येवर खरेतर सर्वपक्षांनी एकत्र येऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र राजकीय पक्षांकडून पाणीप्रश्नाचे भांडवल करण्यात येत आहे. रेल्वे स्थानक, चौकाचौकात, एनएमएमटी, रिक्षांवर सुध्दा स्टिकर लावले आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील आणि माजी नगरसेवक सुनील बहिरा यांनी प्रभाग क्र मांक १७ आणि २० मध्ये पाण्याचा मोफत टँकर सुरू केला आहे. त्या टँकरवर सुध्दा ‘दिवसाआड पाणी, किती दिवस तीच कहाणी’ असा बॅनर लावण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभाग क्र मांक १७ आणि १८ मधील उमेदवार अतुल चव्हाण आणि यतीन देशमुख यांच्याकडून किती वर्षे पाणीप्रश्न प्रलंबित, आता बदल हवा अशा आशयाचा संदेश सोशल मीडियात फिरत आहे.

Web Title: Water problems on the political parties' agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.