पनवेल-सायन महामार्गावर पाणी
By Admin | Updated: August 1, 2016 02:40 IST2016-08-01T02:40:39+5:302016-08-01T02:40:39+5:30
कळंबोली वसाहतीबरोबरच पनवेल-सायन महामार्गावर पाणीच पाणी झाले.

पनवेल-सायन महामार्गावर पाणी
कळंबोली : कळंबोली वसाहतीबरोबरच पनवेल-सायन महामार्गावर पाणीच पाणी झाले. कळंबोली सब-वे आणि कोपरा टोल नाक्यात पाणी शिरले होते. त्याचबरोबर स्टील मार्केट परिसरात दोन ते तीन फूट पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.
काही दिवस उसंत घेतल्यानंतर शनिवारीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. कळंबोलीतील सेक्टर १४ आणि १५ येथील रस्ते पूर्णपणे पाण्यात गेले होते. स्मृती गार्डनजवळ रस्त्यावरून जणूकाही नदीच वाहते की काय असा भास होत होता. खांदा वसाहतीतील शिवाजी चौकात पाणीच पाणी झाले होते. रविवार असल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता.
पनवेल - सायन महामार्गाचे रुंदीकरण करताना योग्य नियोजन न झाल्याने कळंबोली सब-वे परिसरात महामार्गावर दोन फूट पाणी साचल्याने दुचाकी, चारचाकी त्याचबरोबर एसटी, एनएमएमटी, बेस्टला पाण्यातून वाट काढावी लागली. (वार्ताहर)
>स्टील मार्केट पाण्यात
कळंबोली स्टील मार्केटमधील अंतर्गत रस्ते कच्चे असल्याने मोठे खड्डे पडलेले आहेत. याठिकाणी आजतागायत पावसाळी नाले तयार करण्यात आलेले नाही. दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने कच्चे रस्ते पाण्यात गेले. स्टील गोदामामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्त्यावरील खड्डे पाण्यात बुडाल्याने कंटेनर, ट्रेलर चालकांना मोठी कसरत करावी लागली.