पाणीप्रश्नावर पवार-विखे एकत्र!
By Admin | Updated: February 2, 2015 04:42 IST2015-02-02T04:42:33+5:302015-02-02T04:42:33+5:30
राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणा-या शरद पवार व राधाकृष्ण विखे यांनी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळवण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात एकत्रित लढा देण्याचा निर्धार शिर्डीत व्यक्त केला़

पाणीप्रश्नावर पवार-विखे एकत्र!
शिर्डी : राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणा-या शरद पवार व राधाकृष्ण विखे यांनी महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळवण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात एकत्रित लढा देण्याचा निर्धार शिर्डीत व्यक्त केला़
दमणगंगा व नारपार खोऱ्यातील पाणी गुजरातकडे वळवण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात बैठक घेऊन राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही उभयतांनी घेतला़ डाळिंब उत्पादकांच्या परिषदेसाठी आलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्यात येथे चर्चा झाली. पवारांनी जिल्ह्यातील शेती व पाणीप्रश्नाची माहिती घेतली़ गुजरातला पाणी पळवण्याबाबतची माहिती अतिशय गांभीर्याने जाणून घेतली. प्रवरा सामाजिक अभ्यास मंडळ व महाराष्ट्र पाणी परिषदेने याचा सविस्तर अभ्यास केल्याची माहिती विखे यांनी दिली़ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे, आ. वैभव पिचड आदी चर्चेत सहभागी झाले होते.
दमण खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रापैकी ६२ व नारपार खोऱ्यातील ५२ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे़ हे पाणी गुजरातला वळवण्यापूर्वी महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गोदावरी व तापी या तुटीच्या खोऱ्यात वळवावे लागेल़ मात्र राज्य शासनाने याबाबत एकतर्फी निर्णय करण्याची भूमिका घेतली आहे़ पाणी कराराच्या संदर्भातील मसुदा शासनाने जाहीर करावा, ही मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे विखे यांनी पवारांना सांगितले. एकत्रित बैठक घेऊन राज्य व केंद्र शासनाशी बोलू, असे आश्वासन पवार यांनी दिले़
दारणा, भंडारदरा धरणांबरोबरच विखे यांनी पवारांना त्याचा न्यायालयीन लढा, जलसंपदा नियमन प्राधिकरणाने सुरू केलेले दावे, पेरू, डाळिंब उत्पादकांच्या समस्या, उसाचे कमी झालेले क्षेत्र आदींवर चर्चा केली़ (प्रतिनिधी)