महापालिका अधिकाऱ्यांचे ठाण्यात पाणीबचतीचे धडे
By Admin | Updated: May 21, 2016 03:45 IST2016-05-21T03:45:04+5:302016-05-21T03:45:04+5:30
ठाण्यात सध्या पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत.

महापालिका अधिकाऱ्यांचे ठाण्यात पाणीबचतीचे धडे
अजित मांडके,
ठाणे- ठाण्यात सध्या पाणीटंचाईच्या झळा तीव्र होताना दिसत आहेत. त्यामुळे ठाण्यात आठवड्यातून दोन दिवस आणि कळवा, मुंब्रा, दिव्यात तीन दिवसांचे पाण्याचे शटडाऊन घेतले जात आहे. महापालिकेने ठाणेकरांना पाणीबचतीचे आवाहनदेखील केले आहे. हा संदेश देतानाच त्यांनी स्वत:पासूनही पाणीबचतीस सुरुवात केली आहे. एखाद्या अधिकाऱ्याकडे ठाणेकर नागरिक भेटण्यास गेल्यास त्याला विचारल्याशिवाय पाणी दिले जात नाही. तसेच ते देताना अर्धा ग्लासच दिले जात आहे. शिवाय, ज्याज्या ठिकाणी नळांद्वारे पाणीगळती सुरू होती, त्या ठिकाणीच ती बंद करण्याचे कामही सुरू झाले आहे.
ठाणे शहराला आजघडीला ४८० दशलक्ष लीटर पाणी मिळत आहे. विशेष म्हणजे शहराच्या लोकसंख्येच्या मानाने सध्या ते मुबलक असले तरीदेखील अनेक भागांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. उपलब्ध असलेला पाणीसाठा पुरवण्यासाठी महापालिकेने पाणीकपात सुरू केली आहे. तसेच हॉटेल, उद्योग, मॉल आदी ठिकाणी वापरणाऱ्या पाण्यावर अंकुश ठेवण्यासाठी या सर्वांना पाणीबचतीचे आवाहन केले आहे. परंतु, ठाणेकरांना पाणीबचतीची सवय व्हावी, या उद्देशाने पालिकेनेच या मोहिमेची सुरुवात आपल्यापासून केली आहे. महापालिकेच्या माहिती जनसंपर्क विभागात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा विचारूनच पाणी दिले जात असून तेही अर्धा ग्लासच दिले जात आहे. पाण्याची बचत करण्याचे आवाहन ठाणेकरांना करण्याबरोबरच त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच केली असल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी लोकमतला दिली.
नळातून वाहत जाणाऱ्या पाण्यावरदेखील अंकुश बसवण्यासाठी गळक्या नळांची दुरुस्ती करण्याचे कामही केल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या घरच्यांनादेखील जेवढे पाणी आवश्यक असेल, तेवढेच वापरण्याचा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक विभागांनादेखील आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाणीबचत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, प्रत्येक विभागात आता अर्धा ग्लासच पाणी दिले जात आहे. यातूनच पालिकेने जलमित्र होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तसेच लोकमतने सुरू केलेल्या जलमित्र या मोहिमेचेही कौतुक केले आहे.