राम देशपांडे,
अकोला- ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘जलमित्र’अभियानास प्रतिसाद देत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘जलवर्धन’ ही संस्था स्थापन केली. पावसाचा प्रत्येक थेंब संकलित करून या संस्थेने जलसंवर्धनाचा संकल्प पूर्ण केला आहे.उन्हाळ्यात संपूर्ण जिल्हा पाणीटंचाईने होरपळून निघाला. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी व जलजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र’अभियान राबविले. या अभियानातून प्रेरणा घेत शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन ‘जलवर्धन’ ही संस्था स्थापन केली. रोटरी क्लब अकोलाचे प्रांताध्यक्ष डॉ. निखिल किबे व डॉ. सीमा तायडे यांच्या पुढाकाराने उदयास आलेल्या या संस्थेने ‘रेन वॉटर’ व ‘रूफ वॉटर हार्वेस्टिंग’साठी केवळ जनजागृतीच नव्हे, तर अनेक इमारतींवर प्रत्यक्ष कृतीतून ही कल्पना प्रत्यक्षात उतरविली.मोठी मैदाने, रस्त्यांवरील वाहून जाणारे पाणी संकलित करण्यासाठी संस्थेच्यावतीने आदर्श कॉलनी व भारत विद्यालयासमोरील मैदानासह विविध भागातील खुल्या भूखंडांवर जेसीबीद्वारे चर खोदून त्यात शोषखड्डे तयार केले असून त्यात आतापर्यंत झालेल्या पावसाचे पाणी मुबलक प्रमाणात जमा झाले आहे.विशेष म्हणजे ज्या-ज्या भागात संस्थेच्यावतीने जलपुनर्भरणाची कामे करण्यात आली, त्या सर्व भागात जमिनीखाली किमान दोन ते दहा फुटांवर अंतरावर पाण्याचे झरे लागत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. >‘लोकमत’च्या ‘जलमित्र’ अभियानातून प्रेरणा घेऊन ‘जलवर्धन’ स्थापन करण्याची कल्पना सूचली. पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जलजागृती व प्रत्यक्ष कृती या विचाराने संस्था काम करीत आहे. भविष्यात याचे चांगले परिणाम दिसतील, असा विश्वास वाटतो. - डॉ. निखिल किबे,प्रांतपाल, रोटरी क्लब, अकोला