पालिका तोडणार दोन हजार कुटुंबीयांच्या जलजोडण्या

By Admin | Updated: April 4, 2017 03:19 IST2017-04-04T03:19:47+5:302017-04-04T03:19:47+5:30

विकासकाच्या भरवशावर बसलेल्या चेंबूरच्या सुभाषनगर येथील दोन हजार कुटुंबीयांना येत्या काही दिवसांतच पाण्यासाठी वणवण करावी लागणार

Water connections to two thousand families will be broken | पालिका तोडणार दोन हजार कुटुंबीयांच्या जलजोडण्या

पालिका तोडणार दोन हजार कुटुंबीयांच्या जलजोडण्या

समीर कर्णुक,
मुंबई- विकासकाच्या भरवशावर बसलेल्या चेंबूरच्या सुभाषनगर येथील दोन हजार कुटुंबीयांना येत्या काही दिवसांतच पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. इमारतींचा पूर्णपणे पुनर्विकास होईपर्यंत पाण्याचे बिल भरण्याचे आश्वासन विकासकाने रहिवाशांना दिले होते. मात्र साडेतीन कोटींवर हे बिल गेल्यानंतरदेखील थकबाकी जमा होत नसल्याने पालिकेने या सर्व रहिवाशांना नोटीस पाठविली आहे आणि पाण्याचे बिल भरले नाही तर जलजोडणी तोडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पालिकेने याबाबत काही दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
२००३ सालापासून चेंबूरच्या सुभाषनगर परिसरात एका खासगी विकासकाकडून जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत यातील ८ ते १० इमारती तयार झाल्या आहेत. तर अद्यापही यातील अनेक इमारतींचे काम बाकी आहे. या ठिकाणी पुनर्विकास करणाऱ्या विकासकाने रहिवाशांसोबत करार करतेवेळी पालिकेचे पाणी बिल तसेच इतर कर विकासकच भरणार, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार जुन्या आणि नवीन अशा एकूण ५८ इमारतींचे गेल्या अनेक वर्षांपासून विकासकाने पालिकेचे पाणी बिल भरलेले नाही. त्यामुळे सध्या हे बिल साडेतीन कोटींच्या घरात गेले आहे. पालिकेने अनेकदा बिल भरण्यासाठी नोटीस पाठवल्या. मात्र त्याकडे विकासकाने दुर्लक्ष केले. परिणामी पालिकेने सर्व सोसायट्यांच्या नावे अखेरची नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये येत्या ५ ते ६ दिवसांत ही थकीत बिलाची रक्कम भरली नाही तर जलजोडणी तोडण्यात येईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी ही बाब स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांच्या कानावर घातली. त्यांनी तत्काळ याबाबत पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत ही कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे. तसेच पालिकेला पत्र पाठवून संबंधित विकासकाकडून ही थकबाकी वसूल करत त्याच्यावर कडक करवाई करण्याची मागणी मराठे यांनी केली आहे.
>विकासकाची चूक आहे. त्यामुळे पालिकेने ही रक्कम विकासकाकडून वसूल करावी. शिवाय पालिकेने अशा प्रकारे रहिवाशांवर तडकाफडकी कारवाई केल्यास आम्ही पालिकेविरोधात आंदोलन छेडू.
- आशा मराठे, स्थानिक नगरसेविका

Web Title: Water connections to two thousand families will be broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.