वासनकरचे गुंतवणूकदार विदेशातही
By Admin | Updated: August 3, 2014 00:57 IST2014-08-03T00:57:21+5:302014-08-03T00:57:21+5:30
एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. मुळे यांच्या न्यायालयाने वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा प्रमुख प्रशांत वासनकर आणि अभिजित चौधरी याच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये

वासनकरचे गुंतवणूकदार विदेशातही
पोलीस कोठडीत वाढ : दोघांना ६ पर्यंत तर एकाला ४ पर्यंत
नागपूर : एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. मुळे यांच्या न्यायालयाने वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा प्रमुख प्रशांत वासनकर आणि अभिजित चौधरी याच्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये ६ आॅगस्ट तर विनय वासनकरच्या कोठडीत ४ आॅगस्टपर्यंत वाढ केली.
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढाणे यांनी या तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर केले. विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाचा तपास खूप किचकट आहे. आरोपींना आमोरासमोर बसून विचारपूस करावी लागत आहे. आतापर्यंत या कंपनीविरुद्ध एकूण ७९ ठेवीदारांच्या तक्रारी आल्या आहेत आणि १७ कोटी ५४ लाख एवढ्याची फसवणूक या तक्रारींमध्ये नमूद आहे. आणखी नव्याने ११ गुंतवणूकदारांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांच्या ठेवी १ कोटी ४८ लाख एवढ्या आहेत. या कंपनीचे गुंतवणूकदार अबूधाबी, युएई, दुबई, युएसएस या ठिकाणी तसेच देशभरात आहेत. जवळपास ५ हजार गुंतवणूकदार आहेत. या कंपनीने किती रक्कम त्यांच्याकडून स्वीकारली व त्याची गुंतवणूक कुठे केली याचा तपास करणे आहे. ७० ते ८० टक्के रोख रक्कम स्वीकारली होती. या रकमेतून कोणती मालमत्ता खरेदी केली याचाही तपास करायचा आहे. या आरोपींचा नऊ दिवसपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढवून देण्यात यावा, अशी मागणी सरकारपक्षातर्फे करण्यात आली.
सरकार पक्षाला मदत म्हणून गुंतवणूकदारांचे वकील अॅड.बी.एम. करडे, अॅड. वंदन गडकरी, अॅड. गजेंद्र सावजी यांनी बाजू मांडली. तर आरोपींचे वकील शाम देवानी, अॅड, डोडाणी, आनंद देशपांडे यांनी पोलीस कोठडीचा विरोध केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर प्रशांत वासनकर आणि अभिजित चौधरी याला ६ आॅगस्टपर्यंत व विनय वासनकरला ४ आॅगस्टपर्यंत वाढीव पोलीस कोठडी रिमांड सुनवला. यांना २७ जुलै रोजी अटक करण्यात आली होती व आजपर्यंतचा पीसीआर घेण्यात आला होता. पीसीआरची मुदत संपल्याने आज पुन्हा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. (प्रतिनिधी)