वाशिम जिल्हा शल्य चिकित्सकांवर तरूणीचा हल्ला
By Admin | Updated: July 26, 2014 22:19 IST2014-07-26T22:19:03+5:302014-07-26T22:19:03+5:30
मुलाखतीसाठी अर्ज न स्वीकारल्याने राग अनावर

वाशिम जिल्हा शल्य चिकित्सकांवर तरूणीचा हल्ला
वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिकेच्या मुलाखतीसाठी आलेल्या एका युवतीने रागाच्या भरात जिल्हा शल्य चिकित्सकाला मारहाण केली. सदर घटना २५ जुलै रोजी सकाळी १0:३0 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय युवतीविरूद्ध भादंविचे कलम ३५३, ३३६, ५0४ अन्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली. स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त जागेसाठी आज २५ जुलै रोजी थेट उमेदवारांच्या थेट मुलाखती होत्या. या मुलाखतीसाठी अकोला जिल्हयतील मातोडी येथील सरिता शिरसाट नावाची युवती परिचारिकेच्या मुलाखतीसाठी आली होती; परंतु वाशिम जिल्हय़ामध्ये परिचारिकेचे एकही पद रिक्त नसल्याने या जागेसाठी उमेदवारांनी मुलाखतीकरिता अर्ज करू नये, अशा प्रकारची सूचना विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून २३ जुलै रोजी प्रसिद्ध केली होती. परिचारिकेच्या पदाकरिता मुलाखत अर्ज का स्वीकारत नाही म्हणून सरिता सिरसाट हिने थेट जिल्हा शल्य चिकीत्सक व्ही.डी. क्षीरसागर यांचे कार्यालय गाठले. यावेळी सिरसाट हिने जिल्हा शल्य चिकित्सकाला विचारना केली तिला व्यवस्थित समजावून सांगितले. मात्र, सिरसाट हिचा राग अनावर झाल्याने तीने जिल्हा शल्य चिकित्सकाची कॉलर पकडून टेबलावरील फाईल्स फेकून दिल्या. त्यानंतर सदर युवतीने डॉ. क्षिरसागर मिटींग मध्ये जात असताना त्यांच्या दिशेने दगड भिरकावला. अशा प्रकारची फिर्याद डॉ. क्षीरसागर यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी डॉ. क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून सरिता शिरसाट हिचेविरूध्द सरकारी कामामध्ये अडथळा आणणे कलम ३५३, दुसर्याचा जीव धोक्यात टाकणे कलम ३३६ व शिवीगाळ करणे कलम ५0४ अंतर्गत गुन्हा नोंदवून तिला अटक करण्यात आली.