तापमानवाढ महाविस्फोटक विनाशाच्या उंबरठ्यावर
By Admin | Updated: May 7, 2017 03:58 IST2017-05-07T03:58:14+5:302017-05-07T03:58:14+5:30
जागतिक तापमानवाढीसह हवामानात होत असलेल्या बदलांमुळे मनुष्याला शंभर वर्षांत नवी पृथ्वी शोधावी लागेल, असा इशारा नुकताच ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग

तापमानवाढ महाविस्फोटक विनाशाच्या उंबरठ्यावर
- अॅड. गिरीश राऊत -
जागतिक तापमानवाढीसह हवामानात होत असलेल्या बदलांमुळे मनुष्याला शंभर वर्षांत नवी पृथ्वी शोधावी लागेल, असा इशारा नुकताच ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी दिला. महत्त्वाचे
म्हणजे, मानव प्रजाती जीवित ठेवण्याची योग्यताही मनुष्य हरवून बसेल, असाही इशारा स्टिफन यांनी दिला. राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वी पर्यावरणतज्ज्ञांनी जागतिक तापमानवाढीबाबतचे इशारे दिले आहेत. मात्र, आता यावर उपाय शोधण्याची वेळ आली असून, भारतीय पर्यावरण चळवळीने तापमानवाढीवर वारंवार विश्लेषण केले आहे. नुकतेच दादर येथे ‘तापमानवाढ अनियंत्रित झाली आहे’ या विषयावर आयोजित सभेतही भारतीय पर्यावरण चळवळीने याबाबत मते मांडत विविध अभ्यासांद्वारे ‘तापमानवाढ महाविस्फोटक होत ५० वर्षांत जीवसृष्टी नष्ट होईल,’ अशी भीती व्यक्त केली आहे.
दरवर्षी ०.२० सेल्सिअस या गतीने पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे. पाच वर्षांत एक अंशाने तापमान वाढण्याची भीती आहे आणि केवळ चार वर्षांत म्हणजे २०२०-२१ दरम्यान उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत २ अंशापेक्षा जास्त तापमान वाढून ‘पॅरिस करार’ अयशस्वी ठरेल. असे घडल्यास तापमानवाढ अनियंत्रित होत, फक्त ५० ते ७० वर्षांत क्रमश: मानवजात व जीवसृष्टी नष्ट होईल. युनोच्या आयपीसीसीच्या अहवालात जागतिक तापमानवाढ हे वास्तव असून, मानवजात आणि जीवसृष्टी संकटात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कार्बन डायआॅक्साइड, मिथेन, क्लोरोप्लुरोकार्बन्स, नायट्रोजन आॅक्साइड, पाण्याची वाफ इत्यादीच्या उष्णता धरून ठेवत असलेल्या गुणधर्मामुळे पृथ्वी तापत असतानाच, नासाच्या अंतराळ संशोधन विभागाचे माजी संचालक डॉ. जेम्स हॅनसेन यांनी होऊ घातलेली तापमानवाढ ही महाविस्फोटक असेल आणि मानवजात या शतकात नष्ट होऊ शकते, असा इशारा दिला आहे, शिवाय जीवन हवे असेल, तर उरलेले खनिज इंधन (कोळसा, तेल, वायू) पृथ्वीच्या पोटातून काढू नका, असेही म्हटले आहे.
पृथ्वीच्या वातावरणात ‘मौना लोआ’ या प्रशांत महासागरातील केंद्रात प्रथमच कार्बन डायआॅक्साइडने ४०० पीपीएम ही पातळी ओलांडली आहे. दुसरीकडे जागतिक हवामान संघटनेने धोकादायक वातावरण बदल सुरू झाल्याचे यापूर्वीच म्हटले आहे. नासाकडील नोंदीनुसार, २०१६ सालच्या पहिल्या सहा महिन्यांत १९ व्या शतकातील उत्तरार्धाच्या तुलनेत १.३ सेल्सिअसची वाढ झाली आहे. जागतिक हवामान संघटनेकडील नोंदीनुसार, २०१५च्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी प्रमाण ४०० पीपीएमएमपेक्षा जास्त झाले आहे. हे उद्योगपूर्व काळाच्या तुलनेत ४३ टक्क्यांनी वाढले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, जागतिक हवामान संघटना, नासा, राष्ट्रीय महासागर व वातावरण प्रशासनाच्या अहवालानुसार, जानेवारी ते नोव्हेंबर २०१६चे तापमान २० शतकाच्या सरासरीपेक्षा ०.९४ सेल्सिअसने जास्त असून, उत्तर ध्रुवाकडील तापमान पृथ्वीच्या सरासरीपेक्षा दुप्पट वेगाने वाढते आहे. जागतिक हवामान संघटनाच्या म्हणण्यानुसार, २०१६ हे वाढत्या उष्णतेचे सलग तिसरे वर्ष आहे. एकंदर कार्बन उत्सर्जन थांबणे आणि वातावरणात असलेला कार्बन, हरितद्रव्याकडून शोषला जाणे आवश्यक आहे. यावर निष्कर्ष आणि उपाय म्हणजे, ऊर्जेला ऊर्जेचा पर्याय देता येणार नाही. ज्यासाठी ऊर्जा वापरली जाते, ते उद्योग, वीजनिर्मिती, बांधकाम, वाहतूक, रासायनिक शेती जोड इत्यादी थांबविणे, थोडक्यात औद्योगिकीकरण आणि शहरीकरण थांबवणे हाच उपाय आहे.
१८ जानेवारी रोजी जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, सन २०१६ हे तापमानाचा उच्चांक करणारे सलग
१६वे वर्ष ठरले आहे.
डिसेंबर २०१६ हा वाढत्या तापमानाचा सलग २० वा महिना ठरला आहे.
जानेवारी १९८५ पासून डिसेंबर २०१६ पर्यंतच्या सर्व ३७३ महिन्यांतील उच्चतम तापमान हे विसाव्या शतकातील सरासरी तापमानापेक्षा जास्त होते.
नोव्हेंबर २०१६ मधील उच्चतम तापमान
२०व्या शतकाच्या सरासरी तापमानापेक्षा ०.९४ अंशाने जास्त होते.
२०व्या शतकातील सरासरी तापमानात शेवटच्या तीन दशकांतील वाढलेल्या तापमानाचा मोठा वाटा होता आणि आता
२१व्या शतकातील फक्त १६व्या वर्षातील नोव्हेंबर महिन्यातील उच्चतम तापमान यात जवळजवळ १ अंशाचे अंतर आहे.
1युनोच्या जागतिक हवामान संघटनेच्या अहवालाप्रमाणे स्वयंचलित यंत्र येऊन औद्योगिकीकरण सुरू होईपर्यंत लक्षावधी वर्षे साधारणपणे स्थिर असलेले कार्बन डायआॅक्साइडचे वातावरणातील ०.०३ टक्के इतके अत्यल्प प्रमाण, आता सुमारे ५० टक्क्यांनी वाढलेले आहे.
2 भारतातील ९४ शहरे तीव्र प्रदूषणाने ग्रस्त आहेत आणि फक्त विशिष्ट विषारी वायू आणि त्यांच्यामुळे होत असलेल्या ठरावीक आजारांमुळे गेल्या वर्षी सुमारे ११ लाख माणसे देशात मरण पावली. दर मिनिटाला २ माणसे बळी जात आहेत.
युनोच्या आयपीसीसीचे पाचही अहवाल, तसेच गतवर्षीचा पॅरिस करार आणि गेल्या वर्षभरात आलेले नासा व इतर संस्थांचे अहवाल, तापमानवाढीमुळे ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत असल्याचे व त्यामुळे सागर पातळीत वेगाने वाढ होत असल्याचे इशारे देत आहेत.
मागील वर्षापासून दरवर्षी १/५
अंश सेल्सिअस या अभूतपूर्व
गतीने पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे.
येत्या चार वर्षांत या गतीने १ अंश सेल्सिअसची भर उद्योगपूर्व काळाच्या म्हणजे सन १७५०च्या तुलनेत पडत असून, मानवजात वाचविण्यासाठी तापमानातील वाढ २ अंशाच्या मर्यादेत ठेवण्याचे पॅरिस कराराचे उद्दिष्ट धुळीला मिळत आहे.
देशाच्या विविध राज्यांतील व जगातीलही राज्यकर्ते, उद्योग, वीजनिर्मिती, बांधकाम, कार व इतर स्वयंचलित वाहनांची निर्मिती, रासायनिक खते, कीटकनाशके इत्यादींची निर्मिती याच तथाकथित विकासाच्या मळलेल्या वाटेने जात आहेत आणि यामुळे मानवजातीचे नुकसान होणार आहे.
तापमानवाढीचे विविध दुष्परिणाम व सागर पातळीतील वाढ, यामुळे २०३४ पासून पृथ्वीवरील मुंबई-चेन्नई पट्ट्यातील शहरे ओस पडू लागणार, हा प्रशांत महासागरातील हवाई विद्यापीठाचा अहवाल तीन वर्षांपूर्वी आला आहे.
प्राणवायूचे प्रमाण
वेगाने कमी होत आहे. याला स्पष्टपणे औद्योगिकीकरण व शहरीकरण कारणीभूत आहे. यामुळेच कार्बन शोषणारे जंगल आणि सागरातील हरितद्रव्यदेखील नष्ट होत आहे. मुख्य कारणे मोटारकार, कोळसा आणि सिमेंट काँक्रिटीकरण ही आहेत.
उत्तर गोलार्धात युरोपातही अभूतपूर्व बर्फवृष्टी झाली आहे. ग्रीस, रुमानिया इत्यादी देशांत तापमान ३० अंशापेक्षा खाली गेले. या वेळी विषृववृत्तावर श्रीलंकेत आतापर्यंतचा ऐतिहासिक दुष्काळ चालू आहे. दक्षिण गोलार्धात आॅस्ट्रेलियात काही ठिकाणी अधिक ४० अंशापेक्षा तापमान जास्त होत आहे.
पश्चिम अंटार्क्टिकावरील सुमारे पाच हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाचा व सुमारे १ हजार फूट उंचीचा (जाडीचा) प्रचंड हिमखंड मूळ भागापासून सुटला आहे. तो प्रशांत महासागरात शिरत आहे. त्यामुळे त्याच्या आतील भागातील हिमनद्या वेगाने वितळणार आहेत.
उन्हाळ्याची दाहकता वाढत असल्याने वातानुकूलनाचा वापर वाढत आहे. त्यामुळे हे दुष्टचक्र अधिक तीव्र होत आहे. मुंबईत रोज १ हजार ४०० मेगावॅटपेक्षा जास्त वीज वातानुकूलनासाठी वापरली जाते. ही वीज कोळशापासून वीज निर्माण करणाऱ्या कारखान्यातून आली असे धरले, तर रोज सुमारे ३३ हजार टन कार्बन डायआॅक्साइड वातावरणात केवळ मुंबईच्या वातानुकूलनामुळे सोडला जातो.
वाढती लोकसंख्या, हवामानात होत असलेले बदल, उल्कापात आदी कारणांमुळे मनुष्याला शंभर वर्षांत नवी पृथ्वी शोधावी लागेल. मनुष्याला जीवित राहायचे असेल, तर आता दुसरी पृथ्वी शोधावी लागेल. परग्रहावर जाऊन वास्तव्य करावे लागेल. अणू किंवा जैविक युद्धाच्या माध्यमातून मानव जातीचा मोठा ऱ्हास होऊ शकतो. मानव प्रजाती जीवित ठेवण्याची योग्यताही मनुष्य हरवून बसेल. एकूणच परिस्थिती अशी आहे की, मनुष्य पृथ्वीवर अधिक काळ राहू शकणार नाही.
- स्टिफन हॉकिंग, ज्येष्ठ शास्त्रज्ञ