वारली चित्रशैली पोहोचली सातासमुद्रापलीकडे
By Admin | Updated: May 28, 2014 00:01 IST2014-05-28T00:01:48+5:302014-05-28T00:01:48+5:30
ग्रामीण भागातील वारली ही आदिवासी कला आज सातासमुद्रापलीकडे पोहचली आहे. कला जपण्यासाठी काही सामाजिक संस्थांबरोबरच आदिवासी युवकही आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत.

वारली चित्रशैली पोहोचली सातासमुद्रापलीकडे
राहुल वाडेकर, तलवाडा - ग्रामीण भागातील वारली ही आदिवासी कला आज सातासमुद्रापलीकडे पोहचली आहे. कला जपण्यासाठी काही सामाजिक संस्थांबरोबरच आदिवासी युवकही आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. परदेशात होणार्या प्रदर्शनातून वारली चित्रकलेच्या वस्तूंची विक्री केली जात असून ग्राहकांची त्याला चांगली मागणीही आहे़ चित्रशैलीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला तो डहाणू तालुक्यातील गंजाड गावातील आदिवासी समाजाचे जीवा सोमा म्हसे यांच्यामुळे. जीवा यांना या कामगिरीसाठी आतापर्यंत ४३ पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून त्यांची दोन मुले जपानमध्ये वारली चित्रशैलीचे शिक्षण देत आहेत. वारली लोक आपली झोपडी बनविताना करवीच्या झाडांच्या फांद्यापासून कुड बनवितात, यावर शेण- मातीचे मिश्रण करुन कुड सारवतात. त्यावर सणासुदीला तसेच लग्नकार्याच्या वेळी मातीचा रंग तसेच पिठाचा वापर करुन भिंतीवर,ओट्यांवर, झोपडी असेल तर कुडावर,जोत्यावर व अंगणात वारली चित्र काढतात. या चित्रशैलीतून आदिवासी समाजाची संस्कृती, राहणीमान, जीवनमान, नृत्यकला (तारपा नृत्य,ढोल नृत्य) यांचे तसेच शेती,पशुपालन व समाजातील स्त्रियांचे दर्शन घडते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही चित्रशैली जपण्याचा प्रयत्न आता तरुण पिढीकडून होताना दिसत आहे. यामध्ये विक्रमगड तालुक्यातील वाकडुपाडा येथील सुनील खरपडे या युवकाने आदिवासी वारली कला केंद्राची या ठिकाणी स्थापना केली आहे. त्याच्या या कलेला रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. ही कला जपण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांबरोबरच आदिवासी युवकही सरसावले असून ही कला व्यवसायरुपातही उदयास येत आहे. कापड, पडदे, लाकडाच्या वस्तू, सौंदर्याची साधने,घराच्या भिंतीवर, गाडीवरही ही वारली पेंटिंग्ज काढल्या जात आहेत.