पंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार - हायकोर्ट
By Admin | Updated: November 19, 2014 09:38 IST2014-11-19T09:38:41+5:302014-11-19T09:38:41+5:30
आषाढी किंवा कार्तिकी वारीनंतर पंढरपूरमध्ये होणा-या अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचे मत हायकोर्टाने मांडले आहे.

पंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार - हायकोर्ट
ऑनलाइन लोकमत
मुंबई/पंढरपूर, दि. १९ - आषाढी किंवा कार्तिकी वारीनंतर पंढरपूरमध्ये होणा-या अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचे मत हायकोर्टाने मांडले आहे. हायकोर्टाने नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे न्यायाधीशांनी हे मत मांडले आहे.
वारीनंतर पंढरपूरमध्ये होणा-या अस्वस्छतेविरोधात मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल असून यासंदर्भात हायकोर्टाने दोन वकिलांची नियुक्ती करत अहवाल मागवला होता. या द्विसदस्यीय समितीने हायकोर्टासमोर अहवाल मांडल्याचे वृत्त आहे. या अहवालाच्या आधारे हायकोर्टाने अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. 'वारकरी स्वच्छतागृह असतानाही त्याचा वापर करत नाही व त्यामुळेच शहर आणि नदीकाठी घाणीचे साम्राज्य पसरते. याबाबत विठ्ठल - रुक्मिणी मंदिर संस्थाना कोणतेही पाऊल उचलत नाही असे हायकोर्टाने नमूद केल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
पुढील सुनावणीत पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात निर्देश दिले जातील. या सुनावणीला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वारकरी संघटनाचे प्रतिनिधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
समितीने केलेल्या शिफारशी
> कुंभमेळ्याप्रमाणेच यात्रा नियोजनासाठीही स्वतंत्र समिती
> २५० मठांवर शौचालय बांधण्याची सक्ती करावी
> नदीच्या दोन्ही बाजूला यात्रा विभागली जावी
> कायमस्वरुपी शौचालय बांधण्याची सक्ती व कट्टे लावून उभारलेल्या शौचालयांवर बंदी