वर्धा - ११ शहिदांची ओळख पटली, शवविच्छेदन सुरू
By Admin | Updated: June 1, 2016 15:15 IST2016-06-01T14:42:24+5:302016-06-01T15:15:32+5:30
पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातील आग व बॉम्बस्फोट प्रकरणात पुन्हा दोन मृतदेह गवसल्याने शहीदांचा आकडा १८ झाला आहे

वर्धा - ११ शहिदांची ओळख पटली, शवविच्छेदन सुरू
>ऑनलाइन लोकमत -
वर्धा, दि. 01 - पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातील आग व बॉम्बस्फोट प्रकरणात पुन्हा दोन मृतदेह गवसल्याने शहीदांचा आकडा १८ झाला आहे. तर पैकी ११ शहीदांची ओळख पटली आहे. सात जणांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे. सर्व शहीदांच्या मृतदेहांचे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात येत आहे. दहा डॉक्टरांची चमू शवविच्छेदन करीत आहे.
स्फोट इतका भीषण होता की यामध्ये जवानांच्या मृतदेहांच्या अक्षरश: चिंधळ्या उडाल्या होत्या. यामुळे ओळख पटविण्यात चांगलीच अडचण निर्माण झाली आहे. यामध्ये शहीदांचा आकडा वाढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नल रंजित पवार आणि मेजर बी. मनोजकुमार यांचे शवविच्छेदन झालेले असून त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्याची तयारी चालविली आहे.
शहिदांचा आकडा २०, मृतदेह सापडणे सुरूच -
पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातील आग व बॉम्बस्फोट प्रकरणातील शहीदांचा आकडा २० झाला आहे. मृतदेह सापडणे सुरूच असून यात वाढ होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली. सूत्रानुसार, सोमवारी मध्यरात्री झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जवान शहिद झाले. मात्र १६ जण शहिद झाल्याचे सर्वत्र पसरले. पैकी तीन जणांचे शवविच्छेदन मंगळवारीच झाले. बुधवारी पुन्हा तीन मृतदेह गवसले असल्याने शहिदांचा आकडा २० झाला आहे. मृतदेह सापडणे सुरूच असल्यामुळे शहिदांची संख्या नेमकी कितीपर्यंत जाईल हे सांगणे सध्या तरी शक्य नसल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.