महिलेचा विनयभंग करणा-या वॉर्डबॉयची जमावाने केली हत्या
By Admin | Updated: May 25, 2014 19:19 IST2014-05-25T19:09:42+5:302014-05-25T19:19:02+5:30
सातारा येथील वाई परिसरात रुग्णालयातील महिला रुग्णाला गुंगीचे इंजेक्शन देऊन तिचा विनयभंग करणा-या वॉर्डबॉयची संतप्त जमावाने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे.

महिलेचा विनयभंग करणा-या वॉर्डबॉयची जमावाने केली हत्या
ऑनलाइन टीम
सातारा, दि. २५ - सातारा येथील वाई परिसरात रुग्णालयातील महिला रुग्णाला गुंगीचे इंजेक्शन देऊन तिचा विनयभंग करणा-या वॉर्डबॉयची संतप्त जमावाने बेदम मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे.
मुंबईत राहणारी विवाहीत महिला साता-यातील वाई येथे मूळगावी गेली होती. महिलेच्या सासूचे नुकतेच निधन झाल्याने विवाहीत महिला गावी गेली होती. शनिवारी संध्याकाळी विवाहित महिलेला उच्चरक्तदाबाचा त्रास सुरु झाला. अखेरीस त्या महिलेला वाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री रुग्णालयातील वॉर्डबॉयने तिला गुंगीचे इंजेक्शन दिले व तिचा विनयभंग केला. रविवारी सकाळी सातच्या सुमारास महिलेने तिच्या पतीला हा सर्वप्रकार सांगितला. यानंतर महिलेच्या पतीने अन्य काही नातेवाईकांना रुग्णालयात बोलवून घेतले. या सर्वांनी रुग्णालयाच्या बाहेर वॉर्डबॉय तुषार जाधवला गाठले. महिलेच्या पतीने व नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तुषारला सातारा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी संध्याकाळी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तुषारवर विनयभंग तर पिडीत महिलेच्या पतीसह अन्य काही नातेवाईकांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.