गेल्या २०-२१ दिवसांपासून फरार राहिलेल्या वाल्मीक कराडचे नवीन वर्ष पोलीस कोठडीत उजाडणार आहे. केज न्यायालयानेवाल्मीक कराडला १४ दिवसांची कोठडी दिली आहे. सीआयडीने वाल्मीक कराडला १५ दिवसांची कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती, ती न्यायालयाने मान्य केली.
मागील २०-२१ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला वाल्मीक कराड ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला होता. त्यानंतर सीआयडीने त्याला केजला आणले. त्यानंतर केज येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी १५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण दोन्हींचा संबंध आहे. वाल्मीक कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
सरकारी वकिलांनी काय केला युक्तिवाद?
सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा. सुदर्शन घुले अद्याप फरार आहे. कॉलवरील आवाज वाल्मीक कराडचा आहे का, हे तपासायचं आहे, असे सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले. सरकारी वकिलांनी एफआरआयमधील मुद्दे कोर्टाला वाचून दाखवले. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार असून, त्यामुळे वाल्मीक कराडची कोठडी महत्त्वाची असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.
सुदर्शन घुलेने काम बंद करण्याची धमकी दिली होती. हातपाय तोडण्याची धमकी सुदर्शन घुलेने दिली होती.
वाल्मीक कराडच्या वकिलांनी काय केला युक्तिवाद?
वाल्मीक कराड हे सामाजिक कार्यकर्ते, गरीब राजकारणी आहेत. खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणून कोठडी मागणे चुकीचे आहे. खंडणी मागितल्याचे फक्त आरोप झाले आहेत. २ कोटींची खंडणी मागितले, मग पैसे दिल्याचे सांगावे. केवळ राजकीय द्वेषापोटी हत्या प्रकरणात वाल्मीक कराडांना गोवण्यात आले आहे. आवाजाचे नमुने देण्यास तयार आहे, पण कोठडी देऊन नका. वाल्मीक कराड शरण आले आहेत त्यांना न्यायालयीन कोठडी द्या, असा युक्तिवाद वाल्मीक कराडच्या वकिलांनी केला.
युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने रात्री १२ वाजता निर्णय दिला. वाल्मीक कराडला कोठडी देण्याची सीआयची मागणी मान्य करत न्यायालयाने १४ दिवस कोठडी सुनावली.